औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!

| Updated on: Nov 09, 2021 | 10:09 AM

औरंगाबादः दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांसाठी पोलिसांकडून (Aurangabad Police) आपला शेजारी खरा पहारेकरी हे अभियान राबवण्यात येते. मात्र पोलिसांचे हे अभियान चोरांच्या कारस्थानांपुढे फिके पडल्याचेच चित्र दिसत आहे. औरंगाबादेत गेल्या 24 तासात 13 ते 15 घरे फोडून (Theft in Aurangabad) चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या आठवडाभरात गारखेडा, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात […]

औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!
औरंगाबादमध्ये पोलिसांचे अभियान फिके, 24 तासात 13 घरफोड्या
Follow us on

औरंगाबादः दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांसाठी पोलिसांकडून (Aurangabad Police) आपला शेजारी खरा पहारेकरी हे अभियान राबवण्यात येते. मात्र पोलिसांचे हे अभियान चोरांच्या कारस्थानांपुढे फिके पडल्याचेच चित्र दिसत आहे. औरंगाबादेत गेल्या 24 तासात 13 ते 15 घरे फोडून (Theft in Aurangabad) चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या आठवडाभरात गारखेडा, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात तर रविवारी रात्री वानखेडेनगर, एन-13 भागातील आणखी पाच घरे फोडून चोरांनी पोलिसांची झोप उडवली. म्हणजेच गेल्या आठव़डाभरापासून चोरांनी तब्बल 17 घरे फोडून औरंगाबाद पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

एकाच गल्लीतली पाच घरं फोडली

रविवारी मध्यरात्री चोरांनी वानखेडेनगर, एन-13 भागातील एकाच गल्लीतली पाच घरं फोडली. या नगरातील संदीप सुहास साळुंके हे आजीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले होते. हीच संधी साधून चोराने त्यांचे घर फोडत दहा हजार रुपये लांबवले. त्यांच्याच शेजारी राहणारे पोस्टमन दीपक श्रीचंद पवार हेसुद्धा बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री चोरींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 14 ग्रॅम सोन्याचे गंठण, चेन, लॉकेड, पेंडंट, अंगठी असे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केले. मयूर संदीप देवकर हे फायनान्स कंपनीतील कर्मचारी दुपारपर्यंत औरंगाबादेत दाखल झाले नव्हते. त्यांचेही घर चोरांनी फोडले. तर गजानन गिरनारे या कामगाराचे घर फोडून पाच ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे मणी असे आठ ग्रॅमचे दागिने लांबवण्यात आले. अजून एक बंद घरही चोरट्यांनी फोडले, मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी सोमवारी सकाळीच श्वानपथकासह इथे धाव घेतली. मात्र आरोपींचा माग काढण्यात त्यांना यश आले नाही. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

शनिवारी रात्रीदेखील शहरात अनेक घरफोड्या झाल्या. त्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी रात्र गस्तीवर नाराजी व्यक्त केली. रात्र गस्त वाढवण्यास सांगितले असताना अनेक ठाणे प्रभारींनी हे गांभीर्याने घेतले नाही. अनेकजण रात्र गस्त करताना आढळले नाहीत. यापुढे घरफोडी झाल्यास आणि रात्र गस्तीदरम्यान उपलब्ध असलेली वाहने व पोलीस तैनात करण्यात अपयशी ठरणाऱ्या ठाणेदारांना चोऱ्यांसाठी जबाबदार धरले जाईल, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी एका विशेष संदेशाद्वारे दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर रविवारी पुन्हा बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीत पाच घरे फोडण्यात आली. त्यामुळे वरिष्ठांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Aurangabad: लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली, पालकमंत्र्यांना रहिवाश्यांची भावनिक साद, नोटीस रद्द करण्याची मागणी

आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक