औरंगाबादः राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office) भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ग्रामीण आणि शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात आमदार अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी आदींची उपस्थिती होती. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी या दिवशी हिंसक कारवाया घडून आल्या. त्याचे पडसाद अमरावतीसह अन्य काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमटले. मात्र विविध ठिकाणी पोलिसांनी केवळ भाजप कार्यकर्त्यांच अटक करत एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात जोरदार आंदोलन उघडणार असल्याचा इशारा भाजपने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात भाजपच्या वतीने निषेधात्मक आंदोलन करण्यात येत आहे.
त्रिपुरा येथील कथित दंगलींचा निषेध म्हणून महाराष्ट्रात हिंसक कारवाया घडवणाऱ्या संघटनेवर आधी कारवाई करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. त्रिपुरा येथील घटनेप्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमी या संघटनेच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर बातम्या-