औरंगाबादः हैदराबादकडे निघालेली औरंगाबाद-हैदराबाद (Aurangabad-Hyderabad) एक्सप्रेस रेल्वेचे इंजिन आणि डब्यांना जोडणारे कप्लिंग (Railway Coupling) बुधवारी तुटले. यामुळे इंजिनाने रेल्वेचे 12डबे मागे सोडून किमान शंभर फुटांचा प्रवास केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे इंजिन मागे घेऊन कप्लिंग जोडण्यात आले. रेल्वे हैदराबादकडे रवाना झाली. या घटनेत सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. ही घटना बुधवारी दुपारी 4.20 वाजता घडली. या घटनेमुळे शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगचे गेट बंद ठेवावे लागले.
बुधवारी दुपारी 4.20 वाजता औरंगाबाद- हैदराबाद एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार हैदराबादकडे निघाली होती. रेल्वे गेट नंबर 54 पार केल्यानंतर जालन्याकडे जाताना रेल्वेचा वेग वाढला, तेव्हा अचानक इंजिनजवळ मोठा आवाज झाला. त्यानंतर रेल्वेच्या जब्यांचा वेग कमी कमी होत गेला. इंजिन डबे सोडून दूरपर्यंत गेले होते. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने इंजिन थांबवले. त्यानंतर ते मागे घेऊन कप्लिंगच्या सहाय्याने डबे जोडण्यात आले. 4.42 वाजता रेल्वे हैदराबादकडे रवाना झाली. या घटनेमुळे शिवाजीनगर रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शिवाजीनगरसह बीड बायपासपर्यंत दोन्ही बाजूने सुमारे 40 मिनिटे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
औरंगाबाद स्टेशनवरून निघताच रेल्वेचा वेग वाढला. अचानक कप्लिंग निघाल्यामुळे डबे वेगळे झाले अन् इंजिन पुढे निघून गेले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. काही वेळातच डबे थांबले. मोठ्या अपघातापासून बालंबाल बचावल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
इतर बातम्या-