औरंगाबादेत झेंडुची फुले 60 रुपये किलो, वाहने, होम अप्लायन्सेस, रियल इस्टेट मार्केटमध्ये उत्साह

| Updated on: Oct 15, 2021 | 11:30 AM

गुरुवारी सकाळच्या सत्रात 100 रुपये किलो, तर सायंकाळी 60 रुपये किलोने फुलांची विक्री झाली. शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशीदेखील 60 रुपये किलोने झोंडूची विक्री होताना दिसली.

औरंगाबादेत झेंडुची फुले 60 रुपये किलो,  वाहने, होम अप्लायन्सेस, रियल इस्टेट मार्केटमध्ये उत्साह
औरंगाबादच्या बाजारात पिवळ्या आणि केशरी झेंडुची मोठ्या प्रमाणावर आवक.
Follow us on

औरंगाबाद: दसऱ्यासाठी शुभ समजल्या जाणाऱ्या झेंडुच्या फुलांची औरंगाबादच्या बाजारात (Marigold flower in Aurangabad Market) मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. यंदा पाऊस जास्त झाला. त्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव वाढले आहेत. दसऱ्याला घरोघरी तोरण लावले जाते. गुलमंडी, जालना रोड, जळगाव रोड, गजानन महाराज मंदिर, सिडको- हडको भागात झेंडूच्या फुलांची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. गुरुवारी सकाळच्या सत्रात 100 रुपये किलो, तर सायंकाळी 60 रुपये किलोने फुलांची विक्री झाल्याचे पोखरी येथील शेतकरी संदीप हरणे यांनी सांगितले. गेल्या वर्षी 150 रुपये किलोचा भाव मिळाला होता. यंदा शंभर रुपयांच्या आतच फुलांची विक्री करत असल्याचे परदरी येथील फूल विक्रेते शंकर चव्हाण म्हणाले.

दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत 500 घरांची बुकिंग

क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांची खरेदी वाढली आहे. बँकांचे व्याजदर कमी झाले आहेत. त्यामुळे घर घेणे सर्वसामान्यांना सहज शक्य झाले आहे. फ्लॅट, रोहाऊस, दुकाने, प्लॉट, लक्झरी फ्लॅट खरेदी होत आहेत. नवरात्रीपासून ते गणपती व दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत 500 घरांची बुकिंग झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स खरेदीत 10 टक्के वाढ

2019 च्या दसऱ्यादरम्यान 1 कोटी 11 लाखांचा व्यवसाय झाला होता. यंदा 10 टक्के वाढ झाली. ऑनलाइन खरेदीपेक्षा प्रत्यक्ष दुकानात कमी किमती मोबाइल मिळत आहेत. मोबाइल दुकानांमध्ये 1 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा कॅनॉट मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांनी सांगितले. अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अरुण जाधव म्हणाले, ग्राहक टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनची सर्वाधिक खरेदी करत आहेत.

सराफा बाजारात 20 ते 25 टक्के ग्राहक

गांधी पुतळा, सराफा बाजार येथील तिवारी ज्वेलर्सचे मालक विजय तिवारी म्हणाले, गेल्या आठवड्यापूर्वी सोन्याचे भाव कमी झाले होते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर 24 कॅरेट सोन्याचे भाव 50 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 46 हजार 500 प्रति 10 ग्रॅम झाले आहे. येणाऱ्या काळात लग्नसराई असल्यामुळे सध्या बाजारात 20 ते 25 टक्के ग्राहक खरेदी करत आहेत. लॉकडाऊननंतर बाजारात खरेदी वाढली आहे.

इतर बातम्या-

Happy Dussehra 2021 Wishes | आपल्या प्रियजनांना द्या दसऱ्याच्या हटके शुभेच्छा

Dussehra 2021: विजयादशमी कधी आहे ? महत्त्व काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती