औरंगाबाद: राज्यासह देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचं प्रमाण कमी झालं असलं तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. मात्र औरंगाबाद शहरात (Aurangabad city) बहुतांश ठिकाणी नागरिकांना याचा विसर पडलेला दिसत आहे. पूर्वीही रस्त्यावरून जाताना लोक सजग नागरिक मास्क लावत असत, तर कुणी कानाला, हनुवटीला मास्क टांगून ठेवत असत. पोलीस दिसले की मास्क नाका-तोंडावर येत असे. पण आता तर बहुतांश लोकांच्या खिशातदेखील मास्क दिसत नाही. विना मास्क फिराणाऱ्यांवरील कारवाईदेखील थंडावल्याचे चित्र औरंगाबादेत पहायला मिळत आहे.
दरम्यान आजच्या महाराष्ट्र बंदची हाक देणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मोर्चादरम्यान विना मास्क फिरताना दिसले. शहरातील प्रमुख बाजारपेठेत आज महाविकास आघाडीने व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी रस्त्यावरून फिरणाऱ्या या मोर्चेकऱ्यांनीही मास्क न घातल्याचे दिसून आले. आता यांच्यावर कारवाई कोण करणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
सध्या रुग्णसंख्या घटली असली तरीही राज्यातील काही ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढलेली आहे. औरंगाबादच्या शेजारील जिल्ह्यात, अहमदनगरमध्येही कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अनिवार्य आहे, असे आवाहान आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर एखादी व्यक्ती शिंकली तरी लोक त्याच्याकडे संशयाने पहात होते. घरातून बाहेर जाताना कोरोनाच्या भीतीपोटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर प्राधान्याने केला जात होता. घरातून निघताना प्रत्येकाच्या खिशात, बॅगेत, पर्समध्ये सॅनिटायझरची बाटली असायची. मात्र आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटल्याने नागरिक बेफिकिर झाल्याचे दिसत आहे. आधी बाहेर पडल्यावर कुणाच्या कानाला, कुणाच्या हनुवटीवरचा मास्क टांगलेला असायचा. मात्र आता तर बाहेर पडताना बहुतांश नागरिकांच्या खिशातही मास्क सापडत नाही.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी अनेक जण मास्क न घालता फिरत असल्याने आरोग्यप्रती जागरूक नागरिकांचा मात्र संताप होत आहे. एवढे दिवस खबरदारी बाळगल्यानंतर आता कुठे शहरातील बाजारपेठा, धार्मिक स्थळे सुरु झाली आहेत. पण अशा बेफिकिर नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचं संकट ओढवू शकतं, ही भीती प्रामाणिकपणे मास्क घालणारे व्यक्त करत आहेत.
वर्षभरापूर्वी अचानक मागणी वाढलेल्या सॅनिटायझरची विक्रीही कमी झाली आहे. ही विक्री सध्या 1 ते 2 टक्क्यांवर आली आहे. पहिल्या लाटेत रोज 1200 ते 1500 लीटर सॅनिटायझर विकले जात होते. दुसऱ्या लाटेत त्याची विक्री 30 टक्के कमी झाली आहे. आता तर सॅनिटायझर पडूनच असल्याचे चित्र विविध दुकानांमध्ये दिसत आहे, अशी माहिती जिल्हा औषधी विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष निखिल सारडा यांनी दिली.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे. ज्यांनी मास्क घातलेला नाही, त्यांच्याकडून दंडही वसूल करून घेतला जात आहे, अशी माहिती मनपा उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.
महानगरपालिकेचे नागरी मित्र पथक शहरात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करते. शनिवारी दिवसभरात अशा 35 जणांवर प्रत्येकी 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
इतर बातम्या-
औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?