औरंगाबादः सासरच्या मंडळींनी अवघ्या चार महिन्यांचे बाळ (Mother and baby) सुनेकडून हिसकावून घेतले आणि तिला घराबाहेर काढल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली. खूप विनवण्या करूनही सासरची मंडळी बाळाला आईकडे देत नव्हती. त्यामुळे व्याकूळ झालेल्या मातेने अखेर महिला तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेतली. केंद्राच्या आदेशानंतर शहरातील दामिनी पथकाने (Damini Squad) बाळाची आणि आईची भेट घालून दिली. अशा प्रकारे पाच दिवसांपासून आईपासून दुरावलेले बाळ अखेर तिच्या कुशीत विसावले. माता आणि बाळाची भेट घालून दिल्यानंतर हा क्षण पाहून पोलीस पथकही भावूक झाले.
12 वी पर्यंत शिक्षण झालेल्या या आईचे पदमपुरा येथे सासर आहे. 4 महिन्यांपूर्वी या दाम्पत्याला बाळ झाले. परंतु सासरच्यांशी वाद झाल्यामुळे त्यांनी तिला थेट घराबाहेर काढले. खूप विनंती केल्यानंतरही सासरच्या मंडळींनी बाळाला आईकडे दिले नाही. अखेर तिने महिला तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेतली.
दामिनी पथकातील उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पो. कॉ. निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, गिरीजा आंधळे यांनी सदर महिलेच्या सासरच्या मंडळींची समजूत घातली व बाळ आईच्या ताब्यात दिले. तब्बल पाच दिवसानंतर मातेच्या कुशीत बाळ विसावल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही मला देवासारखे भेटलात, असे म्हणत ती आई पथकाच्या पाया पडू लागली. यावेळी दामिनी पथकही भावूक झाले. दामिनी पथकाने बाळासह मातेला घेऊन भरोसा सेलमध्ये आणले. तेथे घटनेची नोंद केल्यानंतर माता आई, वडिलांसोबत माहेरी गेली.
इतर बातम्या-