जालनाः श्रीक्षेत्र राजूरेश्वर (Rajureshwar) येथे लवकरच सहा डब्यांची टॉय ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पुढाकारातून राजुरेश्वर मंदिर परिसरात ही ट्रेन सुरु होईल. या ट्रेनसाठी (Toy Train) मंदिर परिसरातील जागा योग्य आहे का, याची पाहणी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी केली. टॉय ट्रेनसाठी जागा योग्य असलाचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असून यामुळे या योजनेसाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. राजुरेश्वर मंदिराच्या गडाजवळ 800 मीटरचा रेल्वे ट्रॅक राहणार असून सहा डब्यांमधीन भाविकांना सफर करता येईल. रेल्वे रुळासाठी जागेचे सपाटीकरण गणपती संस्थानकडून केले जाईल.
राजुरेश्वर मंदिर परिसर मागील काही वर्षात उत्तम प्रकारे विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील भाविकांची संख्या लाढत आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी मंदिर परिसरात विकासकामेही सुरु आहेत. दूरवरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना थोडा वेळ थकवा घालवण्यासाठी उद्यान व लहान मुलांच्या विरंगुळ्याकरिता काही तरी सुविधा असावी, असा मानस गणपती संस्थानचा होता. जालना येथील मोतीबागेत टॉय ट्रेन देण्यात आली मात्र रेल्वे प्रशासनाने रेड सिग्नल दिला. त्यामुळे आता ही टॉय ट्रेन राजूरला यावी, अशी मागणी आमदार नारायण कुचे व सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती.
रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी राजूर येथील जागेची पाहणी केली. टॉय ट्रेनसाठी ही जागा सोयीस्कर असेल, असेही निरीक्षणात सांगण्यात आले. त्यामुळे रेल्वे विभागाकडून या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. टॉय ट्रेनच्या रुळांसाठी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम गणपती संस्थानकडून लवकरच केले जाणार आहे. राजुरेश्वर मंदिराच्या गडाला ही टॉय ट्रेन वेढा मारणार आहे.