औरंगाबाद| नांदेड- मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) जालना ते नांदेड (Jalna Nanded Express way) द्रुतगती मार्गाचे काम आता हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे. या मालिकेत जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीपकी 77 टक्के जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून 14 हजार 500 कोटींतून हे बांधकाम केले जाणार आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या 2200 हेक्टर जमिनीचे संपादन चार महिन्यात पूर्ण करण्याचे MSRDC चे उद्दिष्ट आहे. जालना नांदेड या मार्गामुळे या दोन्ही शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटरपर्यंत येणार आहे.
समृद्धी महामार्गाद्वारे जालना-नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. याद्वारे शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटर एवढे कमी होईल. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा 12 तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे.
जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी 179 किलोमीटर असून 87 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या 87 गावांपैकी 67 गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली. या मार्गाची वैशिट्ये पुढीलप्रमाणे-
– संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी एकूण 2200 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
– बांधकामासाठी 14 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे.
– या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन पुढील चार महिन्यात पूर्ण केले जाईल.
– ऑक्टोबर 2024 पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे.
– जालना-नांदेड द्रुतगती मार्गामुळे जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे उर्वरीत महाराष्ट्राशी जोडले जातील.
समृद्धी महामार्गातील विस्तारीत भाग असलेल्या प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी एकूण 14 हजार 500 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. जालना ते नांदेड या महामार्गादरम्यान परभणीतून 93 किलोमीटरचा पट्टा, जालना जिल्ह्यातून 66.46 किलोमीटरचा पट्टा तर नांदेड जिल्ह्यातून 19.82 किलोमीटरचा पट्टा जाईल.
इतर बातम्या-