औरंगाबादः छत्रपती शिवरायांच्या माता जिजाऊ (Jijamata jayanti) यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी औरंगाबादमधील पहिल्या जिजाऊ स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे सातारा परिसरातील नारायण नगरातील नागरिकांनी लोकसहभागातून जिजाऊ उद्यानाची निर्मिती केली आहे. तसेच येथे राजमाता जिजाऊंचे पहिले स्मारकही उभारले आहे. आज जिजाऊ जयंतीनिमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळून नागरिकांनी या स्मारकाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिजामाता उद्यान समितीतर्फे करण्यात आले आहे.
नारायण नगरातील नागरिकांनी येथील पडीक जागेवरच सुंदर उद्यान फुलवले आहे. जागेची आधी स्वच्छता करण्यात आली. चहुबाजूंनी वृक्ष लावून तिला उद्यानाचे स्वरुप दिले. पशु पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ तसेच इतर नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. लोकसहभागातून या उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारण्यात आले.
12 जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊंचा जन्मसोहळा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोना संकटामुळे यावेळी उत्सवावर निर्बंध आले आहेत. दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे 5 लाखांवर मावळे येतात. मात्र नागरिकांनी घरच्या घरीच उत्सव साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. सिंदखेडराजा येथे 50 जणांच्या मोजक्याच उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
इतर बातम्या-