औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी औरंगाबादेत पार पडला. मात्र या दिवशी शहरात औरंगाबाचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) हे नाव करण्यावरून झालेल्या वक्तव्यांचीच चर्चा जोरदार झाली. शासनाच्या एका पत्रकात संभाजीनगर छापून आल्याने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच भडकले. कोर्टाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू (Kirin Rijiju) यांनी मात्र वेगळेच संकेत दिले. औरंगाबादच्या नामांतराबाबत जे काय करायचंय, ते वेळेवर करुच, असे सांकेतिक वक्तव्य करून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याच्या वादाविषयी प्रतिक्रिया विचारली असता केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू म्हणाले, “आता सध्या तरी मी या विषयावर काहीही बोलणार नाही. पण जे काही करायचं ते वेळेवर करू..” रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. किरीन रिजिजू यांनी अप्रत्यक्षरित्या नामांतराचे संकेत दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धरण केला. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.
दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या वादात प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर हा शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासून अजेंडा आहे आणि भविष्यातही तो राहील. सामान्य नागरिकांनीदेखील संभाजीनगर हे नाव स्वीकारलेले आहे. जिल्ह्याचे नामकरण करणे ही तर जनभावना आहे. आम्ही जनभावनेसोबत राहू, जनभावनेचा आदर सर्वांनीच करायला हवा, असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे.
इतर बातम्या-
हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले
‘संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय’, पडळकरांचा घणाघात