औरंगाबादः येत्या 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला (Aurangabad MNS) गळती लागली. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जि.प. सदस्य शैलेश क्षीरसागर, अविराज निकम, मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय म्हस्के, माजी नगरसेवक कांतीलाल निरपगारे, सामाजिक कार्यकर्त्या शकिला पठाण, बाळासाहेब औताडे, जुनेद अख्तर, मोहंमद साजिक आदींचा समावेश आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनसे गळकं घर असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. इथे प्रवेश मिळतो, पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सुरात सूर मिसळत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मनसे नवीन घर आहे, म्हणून आम्ही त्यात प्रवेश केला होता. पण तिथे थंडीत कुडकुडण्याशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही, त्यामुळे आम्ही जुन्या घरात परत आलो.
औरंगाबाद शहर आणि जिल्हा पातळीवर सध्या तरी मनसेचा तेवढा प्रभाव राहिलेला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पंरपारगत हिंदुत्ववादी मतदाराला खेचण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे यांचा औरंगाबादेत दौऱा आयोजित करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वीच शिवसेना आमदार यांनी सूत्रे हलवली विविध पदाधाकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. आता नव्याने मोर्चेबांधणीचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे.
इतर बातम्या-