औरंगाबादः वाळूज परिसरातील प्रख्यात कंपनीचा फायनान्स मॅनेजर सोशल मीडियावरच्या अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला. तिने भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे कळाल्यानंतर सदर मॅनेजरने पोलिसात धाव घेतली. फायनान्स मॅनेजर विटखेडा परिसरात राहत असून फसवणूक झाल्यानंतर त्याने सातारा पोलिस स्टेशनमध्ये (Aurangabad police) याविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
मे महिन्यात विटखेडा परिसरात राहणाऱ्या मॅनेजरची अमेरिकेतील इसाबेल लिझी मॉर्गन या महिलेशी दोस्ती झाली. काही दिवसांनंतर मेसेज आणि फोनवर बोलणे सुरु झाले. व्हॉट्सअप चॅटिंगही सुरु झाले. त्यानंतर महिलेने मॅनेजरला अमेरिकेतून महागडी भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. ती सोडवून घेण्यासाठी मॅनेजरला भारतीय सिरीज क्रमांकावरून कॉल प्राप्त झआला. लिझी मॉर्गन नावाच्या महिलेने तुमच्या नावावर पार्सल पाठवले आहे, असे सांगण्यात आले. क्लिअरन्ससाठी टप्प्या-टप्प्याने तीन लाख रुपये उकळले.
अनेक कारणे देऊन 3 लाख रुपये उकळल्यानंतर मॅनेजरने भेटवस्तूची वाट पाहिली. सदर मैत्रिणीला कॉल करून पाहिल्यास तिचा फोन क्रमांकही बंद होता. आपण फसलो आहोत, हे कळताच मॅनेजरने सातारा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे अधिक तपास करीत आहेत.
सोशल मीडियावर कुणीही व्यक्ती कोणत्याही नावाने खाते तयार करू शकते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारे भेटवस्तू पाठवून ती सोडवून घेण्यासाठी पैशांची मागणी होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या-