छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचं गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरुय. या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. मात्र सरकार अद्यापही आंदोलनावर काहीही कारवाई करत नसल्यानं विरोधक आक्रमक होतायत. औरंगाबादच्या नामांतराविरोधातल्या एमआयएमच्या आंदोलनात काल रात्री हा गोंधळ झाला. विशेष म्हणजे 3 फेब्रुवारीला आंदोलन सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी एका व्यक्तीनं औरंगजेबाचा फोटो झळकवल्यानं वाद पेटला. तर 4 फेब्रुवारीला चिखलठाणा भागातल्या एका चौकाला आंदोलकांनी औरंगजेबाचं नाव दिलं. पोलिसांनी नंतर ते हटवलं.
यानंतर 5 फेब्रुवारीला आंदोलकांनी बिर्याणीवर ताव मारला. साखळी उपोषणात बिर्याणी कशी आली? यावरुन टीकाही झाली. वास्तविक आंदोलनाचं नाव साखळी उपोषण असलं तरी इथं उपोषणाला नेमकं कोण बसलंय? हा संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर 6 फेब्रुवारीला आंदोलकांनी रस्त्यावर गोंधळ घातल्यामुळे वाद झाला. इतकं सारं होऊनही गृहविभाग आंदोलकांवर कारवाई का करत नाही, हा प्रश्न विरोधक करतायत.
ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एमआयएमच्या आंदोलनावर कारवाईची मागणी केलीय. तर औरंगजेबाच्या फोटो आम्ही झळकवला नसल्याचा दावा करत आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही, असं खासदार इम्तियाज जलील म्हणतायत. दुसरीकडे नामांतरा विरोधात सुरू असलेले आंदोलन इम्तियाज जलील यांनी आता बंद करावे, आणि जर नामांतराला विरोध असेलच तर तुम्ही कोर्टात जा, असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना दिलंय.
शहराचं वातावरण बिघडण्याचा काम काही लोक करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आणि प्रदीप जयस्वाल यांच्यावरही औरंगजेबच्या कबरीवरील वक्तव्याविरोधात कारवाई करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केलीय.
मी कोणता नियम मोडला आहे की या आंदोलनावर कारवाई करण्याची मागणी केली जात असल्याचं जलील यांनी म्हटलंय.
तर औरंगजेबाचं उदत्तीकरण कोण करत आहे, यांच्या डोक्यात औरंगजेब इतका भरला आहे तर त्याला मी काय करू? असं जलील यांनी
विरोधकांना म्हटलंय. तसेच जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. मग कितीही महिने लागले तरी चालेल , अशी भूमिका जलील यांनी घेतली.
विधानसभेतही हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर सरकारच्या वतीनं याकडे तातडीनं लक्ष दिलं जाण्याचं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलंय. दीड वर्षांपूर्वी जेव्हा एमआयएम खासदारानं औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती, तेव्हा विरोधकांनी रान उठवलं होतं. मात्र साखळी उपोषणाच्या नावाखाली एमआयएम समर्थक कायद्यालाच आव्हान देत असल्यामुळे सरकार कधी कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं आहे.