जालना | 4 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटले आहेत. पोलिसांनी केलेल्या या बेछूट हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे. अनेक शहरे आणि जिल्ह्यात सकाळपासूनच कडकडीट बंद सुरू आहे. व्यापाऱ्यांनी तर दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. तर अनेक जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी निदर्शनही करण्यात येणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बंदला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
राज्यात आज औरंगाबाद, सातारा आणि बारामतीत मराठी संघटनांनी बंद पुकारला आहे. बारामतीत मोर्चाही काढला जाणार आहे. तर सकल मराठा संघटनेने पुण्यातील खेड, चाकण आणि आळंदीत बंद पुकारला आहे. या बंदला वकील असोसिएशनने पाठिंबा दिला असून व्यापारी संघटनाही बंदमध्ये उतरल्या आहेत. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. तसेच चाकण आणि राजगुरूनगर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद सुरू आहे.
सोलापूरच्या बार्शीतही बंदची हाक देण्यात आली आहे. बार्शीत मराठा संघटनांकडून आज सकाळी निदर्शने करण्यात येणार आहेत. बार्शीत सर्व दुकाने बंद आहेत. हॉस्पिटल, मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील संकेश्वर उद्यान, कसबा पेठ आणि कोर्ट परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत.
नाशिकच्या लासलगावसह 42 गावातील दुकाने बंद राहणार आहेत. याशिवाय लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हिंगोली आणि नांदेडमध्येही सकाळापासूनच बंद सुरू आहे. नांदेड शहरातील राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान बंदचे पडसाद सकाळ पासून जाणवायला सुरुवात झालीय, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तर धुळ्यातून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस आजही बंदच राहिल्याने ग्रामस्थांची मोठी कुचंबना झाली आहे. त्यातच अनेक खासगी वाहन चालकांनीही आपली वाहने बंद ठेवल्याने अनेकांना प्रवासकरण्यात अडचणी येत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ निफाड बंडची हाक देण्यात आली आहे. या बंदला दुकानदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने निफाडमध्ये कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी, वसमत आणि हिंगोली या तिन्ही आगारातील 160 बसेस आजही ठप्प आहेत. तिसऱ्या दिवशी ही तिन्ही आगारातील बस सेवा संपूर्ण बंद असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. हिंगोलीत अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण हिंगोली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व छोटया मोठ्या बाजारपेठा बंद आहेत. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. मराठा समाजाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलकावर लाठीचार्ज, गोळीबार करणाऱ्यावर आणि त्यांना आदेश देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कल्याणमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील दुकानदार, रिक्षाचालक, व्यावसायिकानी या बंदला पाठिंबा दिल्याने शहरात शुकशुकाट पसरला आहे.