औरंगाबादः वाळूज एमआयडीसीतील (Waluj MIDC) बजाजनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी महिलेचे मंगळसूत्र आणि मोबाइल हिसकावून घेणाऱ्या चोरांना पोलिसांनी चोवीस तासांच्या आता जेरबंद केले. या दोन्ही चोरट्यांकडून मंगळसूत्र व मोबाइल जप्त केला. गुरुवारी रात्री या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले होते.
21 ऑक्टोबर रोजी शारदा दिलीप तांबट (35) या गुरुवारी रात्री बजाजनगरातील जय भवानी चौकात असलेल्या भाजी मंडईत गेल्या होत्या. तेथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरून तिघे भामटे आले. त्यांनी शारदा तांबट यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व हातातील मोबाइल हिसकावून वडगावच्या दिशेने फरार झाले. तांबट यांनी एका भामट्याचे वर्णन पोलिसांना सांगितले होते. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती. यातील दोन भामटे पंढरपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सापळा रचून राहुल अशोक धोत्रे व सलमान आरिफ शेख यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले. या दोघांची झडती घेतली असता शारदा तांबट यांचे मंगळसूत्र व मोबाइल सापडला. या दोघांकडे असलेल्या तिसऱ्या मोबाइलविषयी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी हा मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. तिसरा चोर पसार असून त्याचा शोध सुरु आह. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेन ओगले, पो.ना प्रकाश गायकवाड, पो.ना. बाबासाहेब काकडे आदींनी पार पाडली.
शहरातील अन्य एका घटनेत, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने एक लाखात सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पत्नीसह तिच्या तीन साथीदारांना चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. चौघा आरोपींना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी शनिवारी दिले.
रामचंद्र रमेश जायभाये (33) यांची हत्या करणारी त्यांची पत्नी मनीषा (25), प्रियकर गणेश ऊर्फ समाधान सुपडू फरकाडे (21, रा. पिसादेवी), राहुल आसाराम सावंत (22, रा. सातारा परिसर) आणि निकितेश अंकुश मगरे (21, रा. बालाजीनगर, मोंढा नाका) यांना पोलिसांनी अटक केली. रामचंद्र यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी पिसादेवी भागातील नाल्यात आढळून आला होता. मनीषाने पतीच्या हत्येसाठी एक लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी 21 हजार रुपये हत्येपूर्वी दिले होते. गुन्ह्यातील वापरलेला चाकू हर्सूल-पिसादेवी रोडवरील सुखना नदीच्या पाण्यात टाकल्याचे सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील नीता कीर्तिकर यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले कपडे, हत्यार व वाहन जप्त करणे, गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली, रक्कम आरोपींनी कोठून आणली, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
इतर बातम्या-