संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 26 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावरच टीका केली आहे. हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? पेलणार नाही, झेपणार नाही ते हेच होतं का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी या हल्ल्यावरून कानावर हात ठेवले आहेत. हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
हल्ल्याबाबत मला काहीच माहीत नाही. कोण आहेत? काय आहेत? माहीत नाही. हल्ल्याबाबत मला मीडियाच्या माध्यमातून कळलं. कुणाच्या गाडीला धक्का लागलाय की लावलाय माहीत नाही. पण मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय. हजारो गावात आंदोलन करतोय. आताही करत आहे. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. सरकारने गांभीर्याने घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
वाहनांची तोडफोड झाली, त्याचं समर्थन करत नाही. मराठा समाज शांततेतच आहे. त्याला आवरण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाज शांततेत आहे, शांततेत राहील. तो वेगळं आंदोलन करणार नाही. कुणी हल्ला केला माहीत नाही. पण तो कोणत्याही समाजाचा असो. मराठ्यात माणुसकी जिवंत आहे. ज्याच्यावर हल्ला झाला, ज्यांनी हल्ला केला मग ते कोणत्याही समाजाचे असोत आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांचे लाड झाल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यालाही जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडूनच त्यांचे लाड झाले आहेत. 70 वर्षात आमच्याकडून लाड झालेत. आम्ही मराठ्यांनी खूप लाड केलेत. खूप मोठं केलं. त्यांची मुलं मोठी झाली. आमची मुलं मोठी करायची आहेत. मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये म्हणून त्यांचे चारही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांचं षडयंत्र आम्ही उधळून लावणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
त्यांचे कोण कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही हे सर्वांना माहीत आहे. मराठा समाजाने त्यांच्या श्रद्धेयांना मोठं केलं. त्यांचे लाड केले. ते सध्या विमानाने फिरत आहेत. त्यांची लेकरं ऐषारामात जगत आहेत. आमचे चिखलात आणि अंधारात आहेत. त्यांना मोठं होऊ दिलं जात नाही. सर्वच राजकीय पक्षाचे लोक त्याला जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर कशाला वेळ घेतला? तुम्ही 50 वर्षाचा वेळ देता का म्हणून विचारायचं होतं ना? आम्ही तुम्हाला वेळ दिला होता. आम्ही चार दिवसाचा वेळ दिला होता. तुम्ही म्हणाला चार दिवसात तुमच्या मागणीप्रमाणे कायदा पारीत होणार नाही. तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला.
आता आणखी वेळ मागून नाटकं शिकवायला लागले का आम्हाला? मराठ्यांनी तुम्हाला ओळखलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी ठरवलं आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आमच्या दारात येऊ नका. किती सोपा विषय आहे. आमच्या जखमेवर का मीठ चोळत आहात? असा सवाल त्यांनी केला.