जालना | 8 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. गेल्या अकरा दिवसापासून जरांगे पाटील यांनी अन्नाचा एक कणही खालेल्ला नाही. त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यतांना बोलतानाही त्रास होतोय. अशक्तपणा आल्याने त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय उठायचंच नाही. नाही तर इथेच जीवनयात्रा संपवायची असा निश्चयच जरांगे पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज प्रचंड संतापला आहे. सरकार विरोधात या समाजात प्रचंड राग निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचं अंतरावली सराटी गावात उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. गेल्या अकरा दिवसापासून जरांगे पाटील हे घराकडे गेले नाहीत. त्यांची प्रकृती ढासळल्याचं कळताच जरांगे पाटील यांच्या आई प्रभावती जरांगे यांनी आपल्या लढवय्या लेकाची भेट घेतली. आईला उपोषण स्थळी येताना पाहून जरांगे पाटील यांच्या काळजात कालवाकालव झाली. जरांगे पाटील यांचं मन हेलावलं. आई जवळ येताच जरांगे पाटील यांनी आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आईला घट्ट मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले होते.
त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढासळू लागले. त्यांचा कंठही फूटत नव्हता. बोलता बोलत्या डोळ्यातून अश्रू वाहणे सुरूच होते. हे पाहून सर्वचजण हेलावले. मंचावरील आणि मंचासमोरील लोकांनाही अश्रू आवरणे कठिण झालं होतं. सर्वच हेलावून गेले होते.
मी गावासाठी कर्म भूमीसाठी जीव पणाला लावला. माझ्यासाठी मराठा समाज पेटून उठला आहे. या पोराच्या पाठी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोक माझ्यामागे उभे राहिले. महाराष्ट्रातील माता माऊल्यांना सांगतो या पुढे आरक्षणासाठी मुडदे पडू देणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मराठ्यांची मान खाली जाऊ देणार नाही. मी एकाही मराठ्याला झुकू देणार नाही. महाराष्ट्र आणि माझं गाव माझ्या मागे उभं आहे. याचा अभिमान आहे. मला बोलता येत नाही . मी तुमच्या ऋणात आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील बोलत असताना त्यांची आई त्यांचे अश्रू पुसत होत्या.
यावेळी जरांगे पाटील यांच्या आईनेही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माझ्या मुलाच्या पाठी सर्वांनी उभं राहण्याचं आवाहनही केलं. मराठ्यांना आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या. सर्व बाळांना न्याय द्या. अशा भावना प्रभावती जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.