मराठा आंदोलनाचा फियास्को करण्यासाठी कोणतं षडयंत्र?; मनोज जरांगे यांना काय इनपूट मिळाले?

| Updated on: Jan 16, 2024 | 3:17 PM

किती ताकदीने आमदार आणि खासदार रॅलीत येणार आहे हे आम्ही पाहणार आहोत. कोण समाजासाठी काय करतो तेही पाहणार आहोत. पण आपल्याच लोकांनी विश्वासघात करू नये. तुमच्या प्रसिद्धीसाठी आंदोलनाला डाग लावायला येऊ नका. रॅलीत कोण कोण नाराज घुसणार आहेत हे पाहणार आहे. आम्हाला रॅलीतून बाहेर काढलं असा बनाव केला जाणार आहे. तुम्ही काही नवसाचे नाही. सर्व समान आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आंदोलनाचा फियास्को करण्यासाठी कोणतं षडयंत्र?; मनोज जरांगे यांना काय इनपूट मिळाले?
manoj jarange
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 16 जानेवारी 2023 : मनोज जरांगे पाटील यांचा लाँगमार्च 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत. मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये म्हणून सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं सांगत जरांगे यांनी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होण्यास अवघे चार दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. तसेच मराठा नेत्यांवरही आरोप केले आहेत. मराठा आंदोलनाचा फियास्को करण्याचा सरकारचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना गंभीर आरोप केले आहेत. माझी मराठ्यांना विनंती आहे, संकटकाळात मला साथ द्या. मला सरकारने गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. यांच्या बैठका सुरू आहेत. आपल्याच विरोधात मराठ्यांचा वापर केला जाणार आहे. काही मराठा नेत्यांना पुढे केलं जाणार आहे. आपल्या विरोधात बोलायला सांगितलं जाणार आहे. हे पाच पन्नास लोक आहेत. पण तुम्ही संकटात माझ्या सोबत राहा. मी मागे हटणार नाही. आपल्याविरोधात आपल्याकडे लक्ष न देण्याचं षडयंत्र होऊ शकतं. आपले कोणते शब्द चुकले यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. रॅलीत हिंसाचार घडवायचा, सरकारचेच लोकं घुसवायचे आदी प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

15 दिवसांपूर्वीच त्यांची प्रात्यक्षिके

मला सत्यच माहिती मिळाली. सांगणारा कच्चा नाही. ताकदीचा माणूस आहे. पण मी विश्वास ठेवणार नाही. मीही खात्री करणार. आमच्या रॅलीत आमचाही फौजफाटा राहणार आहे. आमचेही पोरं सर्व बाजूने लक्ष ठेवून राहतील. सीआयडी, सीबीआयसारखे आमचे पोरं डोळ्यात तेल घालून रॅलीवर लक्ष ठेवतील. उद्रेक करणारा सरकारचा आहे की कुणाचा आहे हे शोधणार आहोत. ज्यांच्या समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या बंद पडल्या, त्यांचं करिअर संपलं असे लोक रॅलीत येणार आहेत. हे लोक आम्हाला पत्रकार परिषदेतून हाकलले, असा आव आणतील, नंतर तेच लोक वेगळ्या सभा घेतील. त्यांची प्रात्यक्षिके 15 दिवसांपूर्वीच करून घेतल्या आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

मंत्र्यांना हाताशी धरून डाव

रॅलीत जायचं, रॅलीतून हाकलून दिल्याची बोंब करायची. पत्रकार परिषद घ्यायची, सभा घ्यायची असे डाव केले जाणार आहेत. आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव राहणार आहे. सरकार काही मंत्र्यांना हाताशी धरून हे करणार आहे. त्यामुळे मी मराठ्यांना सांगतो फक्त सावध राहा. घाबरण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले.

तर डोंगरात जाईन

मला रात्री 4 वाजेपर्यंत सारखे संदेश होते. राज्यात 15 दिवसांपासून काय काय घडलं आणि काल दिवसभरात सरकार आणि विरोधकात काय घडलं याची खबर मिळत होती. यांना आरक्षणाचा मुद्दा संपवायचा नव्हता. यांना हा मुद्दा रेंगाळत ठेवायचा होता. अरे इतकं वाईट वागू नका. अकली धरा. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी समाजाचं वाटोळं करू नका. अडीचशे पेक्षा जास्त भावांचं बलिदान गेलं आहे. त्यांच्या कुटुंबातील एकही माणूस मला नेता व्हायचं असं म्हटला नाही. उलट आमच्या घरातील व्यक्तीने ज्यासाठी बलिदान दिलं त्यांचं स्वप्न पूर्ण करा, असं त्यांनी म्हटलंय, असं सांगतानाच समाजाला आरक्षण मिळालं तर डोंगरात जाईन. मला नेता बनायचं नाही. मला काहीही करायचं नाही, असंही ते म्हणाले.

प्रसिद्धी थोडी कमी मिळेल, पण आड येऊ नका

मी मरायला भीत नाही. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. मी आरक्षण घेतल्याशिवया राहणार नाही. उद्या मी असलो नसलो तरी विचार मरू देऊ नका. सरकार येऊ द्या की विरोधी पक्ष येऊ द्या सर्वांना मी भिडायला तयार आहे. ज्यांना स्टंट करायचा आहे, प्रसिद्धी हवी आहे, अशा लोकांबाबत मी खंबीर आहे. त्यांना सांगतो समाजासाठी चार पावलं मागे व्हा. तुम्हाला थोडी प्रसिद्धी कमी मिळेल, राहू द्या. पण समाजाच्या आड येऊ नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.