जालना | 14 ऑक्टोबर 2023 : आरक्षणाच्या मुद्दयावरून मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी सरकारला आज थेट इशाराच दिला आहे. तुमच्या हातात फक्त दहा दिवस आहेत. आता समित्यांचा घाट बंद करा. मराठे कुणबी असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षण जाहीर करा. आता एक तर विजय यात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्राच निघेल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे सहा मागण्या मांडल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत विशाल जनसागराला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे सहा मागण्या मांडल्या आहेत. या सहाही मागण्या मान्य करा असं आवाहन त्यांनी सरकारला केलंआहे. त्यातील चौथ्या मागणीवरून मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करा. सर्व्हे करून ओबीसींच्या ज्या प्रगत जाती आहेत, त्यांना आरक्षणातून वगळण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या मागणीवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक मागणी केली. अंतरवली सराटीत उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमंध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण एक महिना झाला तरी काहीच प्रक्रिया न झाल्याने जरांगे पाटील यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी जरांगे पाटील यांनी त्यांचं फेसबुक अकाऊंट सरकारने बंद केल्याचा आरोप केला. सभेला येण्याआधी दोन तासात सरकारने माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं. हा विशाल सागर पाहा. नेट बंद करून काय होणार आता. तुम्हाला गादीवरच आम्ही बसवलंय. तुम्ही आमच्या लेकरांना विष पाजाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात फेकू हे कळणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला.