संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 22 ऑक्टोबर 2023 : दोन दिवसात आरक्षणाचा न्याय द्या. भावनेशी खेळू नका. कसलीही कमतरता नाही. सर्व पुरावे तुमच्याकडे आहेत. समितीने पुरावे गोळा केले आहेत. आता पुन्हा समितीला काम लावू नका आणि वेळ काढूपणा करू नका. मराठ्यांना सर्व समजतंय, असं सांगतानाच तुम्ही सलाईनवर आहात की कोमात? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. आम्ही आमच्या तयारीला लागलो आहोत. तुम्हीही तुमच्या तयारीला लागा. तुम्हीही आरक्षण देण्याची तयारी करा, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत समाज बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही जे मागितलं नाही ते सांगत आहेत. ईडब्ल्यूएस दाखवता तर इतरांनाही आरक्षण आहे. त्याची आकडेवारी दाखवली का? सारथी संस्थेचं सांगता. इतरांसाठी संस्था नाही का? ईडब्ल्यूएस आम्ही मागितलं नाही का देता?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आमचे विद्यार्थी आझाद मैदानला बसले त्यांना नोकरी देता आली नाही. 2 ते 3 हजार मुलं आहेत ईडब्ल्यूएसची. त्यांना घेतलं का आत? नाही घेतलं. परिस्थिती बदलणार नाही. त्याचा फायदा आहे नाही ते सांगू नका. त्याची आकडेमोड देऊ नका. सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीत समावेश हे पाहिजे. बाकीचं सांगायचं नाही. आम्हाला आऱक्षण पाहिजे. सवलीतीचे बहाणे सांगू नका, असंही ते म्हणाले.
आम्हाला मलमपट्टी नको. कायमचा उपचार पाहिजे. ते म्हणजे आरक्षण. अजूनही सरकारला दोन दिवस आहेत. हात जोडून विनंती. दोन दिवस हातात आहेत. मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यांना त्यांच्याशी खेळू नका. त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला येणार आहेत. ते हुशार आहे. गरीबीतूनवर आले आहे. त्यांनाही मराठ्यांच्या वतीने विनंती आहे की, त्यांनी राज्य सरकारला 24 तारखेच्या आत प्रश्न सोडवावा. म्हणजे 26 तारखेला आम्ही शिर्डीला गुलाल घेऊन जाऊ, असंही ते म्हणाले.