संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 16 जानेवारी 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवरच आरोप केले आहेत. मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही मंत्र्यांनाही फूस लावली जात आहे. काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे, असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे गौप्यस्फोट करतानाच सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी रात्री बोलणं झालं. जे चार शब्द सुचवले आहेत, त्याबाबत शासन निर्णय करा असं त्यांना सांगितलं होतं. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहे. त्यापैकी किती कुटुंबाला प्रमाणपत्र दिले? ज्यांची प्रमाणपत्र सापडले आहेत, त्यांच्या कुटुंबातील किती लोकांना प्रमाणपत्र दिलं? त्याची माहिती द्या असं शिष्टमंडळाला सांगितलं आहे. मराठा समाजावर टाकण्यात आलेल्या केसेसवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. आम्ही 20 जानेवारीची तयारी करत आहोत. शिष्टमंडळाला काय करायचं ते माहीत नाही. मला समाज महत्त्वाचा आहे, चर्चा महत्त्वाची नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
चर्चा सर्वच केली. ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या घरातील किती लोकांना प्रमाणपत्र दिलं हे विचारलं. केवळ 54 लाख नोंदी सापडल्या एवढं नको, प्रमाणपत्र दिलं का ते सांगितलं पाहिजे. सोयरे शब्द त्यात घेतला असता तर ही वेळच आली नसती. आम्हा सर्वांना आरक्षण हवं आहे. सरकार सर्व डाव टाकण्याच्या तयारीत आहे. माझ्यावर डाव टाकला जाणार आहे. मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मीही माहिती घेत आहे. माझ्यावर ट्रॅप लावण्याचीही शक्यता आहे. मी जबाबदारीने सांगत आहे. मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या रॅलीत कुणाला तरी घुसवायचा प्लान सुरू आहे. त्यांचेच लोकं आणि अधिकारी आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे मराठा समाज सावध आहे, असा दावा जरांगे यांनी केला.
रॅलीत चालत असताना आजूबाजूला लक्षात ठेवा. स्वयंसेवक म्हणून काम करा. येवल्याचाही बोलतो 200 रिव्हॉल्वर विकत घेतल्या. आमची मनगटं बळकट आहेत. त्यामुळे सावध राहा. आपल्या आसपास लक्ष ठेवा, कोणी हिंसाचार करतोय का? कुणी जाळपोळ करतोय का? यावर लक्ष ठेवा. कारण घडून ते आणतील आणि नाव मराठ्यांवर टाकतील, असा आरोप त्यांनी केला.
केंद्र आणि राज्य सरकारला मराठे का नको. मराठ्याकडून सत्ता पाहिजे. मग मराठे का नको, तुम्ही आम्हाला मुंबईत का अडवणार? का तुम्ही अंतरवलीसारखा लाठीचार्ज करण्याचा प्रयोग करणार? तुम्ही का तपासण्या लावल्या? बिनतारी संदेश का पाठवले? लोकांचे ट्रॅक्टर का मोजत आहात? इतकं दडपण का? रात्री 2 वाजेपर्यंत बैठक का घेतल्या जात आहेत? मराठ्यांना जेरीस आणण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे?, असा सवाल त्यांनी केला.
सरकारच्या काही मंत्र्यांना पुढे केलं जात आहे. त्यांची नावं माहीत नाही. त्यांची नावे माझ्याकडे आलेली नाही. मीही त्याबाबत माहिती घेत आहे. रात्रीही सरकारची बैठक झाली. हे मी खूप जबाबदारीने बोलतोय. त्यांचीही रात्री बैठक झाली. काही जणांचा मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्याबाबतची माहिती काढणार आहे. त्यांच्या बैठकीत आरक्षण देण्यास विरोध झाला. चर्चा झाली. काहींनी तर मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असं ठरवल्याचं समजतं.
मराठ्यांना किंमत द्यायची नाही असं ठरवलंय. आमच्या कानावर आलं. ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या आहेत त्यांनी आणि सरकारच्या काही मंत्र्यांनी डाव रचले आहेत. त्यांना एकत्र करून मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला सांगितली जात आहे. त्यांना चॅनलवर डिबेटला पाठवलं जाणार आहे. असंही सरकार पक्षाकडूनच प्रयत्न सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला.
गुजरातमधून फोर्स बोलावल्याची मला माहिती मिळाली आहे. संरक्षणासाठी बोलावलं असेल. त्याबाबत माझा काही आरोप नाही. दुसऱ्या राज्यातूनही फोर्स बोलावली आहे. संभाजीनगरला ते आले आहेत. आम्हाला सरकारमधील लोकांनीच माहिती दिली. मी खात्रीलायक माहिती घेतल्याशिवाय मी एखाद्या व्यक्तीबाबत बोलणार नाही. मी शाहनिशा करणार आहे. फक्त समाजाने संकटात सोबत राहावं. सरकारने कितीही षडयंत्र रचले तरी मी हटणार नाही. सरकारसमोर दोनच पर्याय आहेत. एक तर आरक्षण द्या. नाही तर सहा कोटी मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागणार आहेत, तरच आम्ही मागे हटू. नाही तर हटणार नाही. एकही मराठा मरायला घाबरणार नाही, असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला.