औरंगाबाद: कोणत्याही खेळाचं मैदान तयार करायचं म्हटलं, एखाद्या स्पर्धेसाठी ग्राउंड सज्ज करायचं म्हटलं की आधी या माणसाला तिथं हजर केलं जायचं. किंबहुना मैदानांचा अभ्यास अन् खेळासाठीची प्रचंड ऊर्जा घेऊन अवतरलेला, मराठवाड्याचा एकमेव इसम म्हणजे मोहम्मद अब्दुल रझाक!! 80 वर्षांच्या या हॉकीपटूचं नुकतंच औरंगाबादेत निधन झालं. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील प्रत्येक क्रीडांगणाच्या मातीला त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कौशल्याचं बळ मिळालं. त्यांनी घडवलेल्या मैदानांवरच शेकडो, हजारो खेळाडूंनी घाम गाळला अन् आज हे खेळाडू आपली कारकीर्द गाजवतायत. आता मराठवाड्यातला हा अस्सल ग्राउंडमॅन यापुढे आपल्यात नसणार, या भावनेने अवघ्या क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
रझाक मामूंचा जन्म औरंगाबादच्या छावणी परिसरातला. ते नऊ वर्षांचे असताना त्यावेळी मिलिंद कॉलेजचं बांधकाम सुरु होतं. त्यावेळी रुंजाजी भारसाखळे यांनी रझाक मामूंमधील काम करण्यासाठीची उत्साही वृत्ती हेरली आणि त्यांना कॉलेजपरिसरात बांधकामाला लावून घेतलं. त्यावेळी छावणी हे हॉकीचं माहेरघर होतं. रझाक मामूंनी हॉकी खेळायला सुरुवात केली अन् पाहता पाहता त्यात प्रचंड प्रावीण्य मिळवलं. मिलिंद कॉलेज सुरु झालं तो काळ होता 1955-56चा. डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी कॉलेजमध्ये डायरेक्टर ऑफ स्पोर्स्ट्स या पदावर रिटायर्ड मेजर शर्मांना अपॉइंट केलं. आंबेडकरांनीच रझाक मामूंना मेजर शर्मांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती दिली. मिलिट्रीचं ग्राउंडही शर्मांच्या देखरेखीखाली होतं. त्यावेळी आर्मीचे लोकं गोल्फ खेळायचे. ते ग्राउंड तयार करण्याचं कामही मेजर आणि रझाक मामू यांनी केलं होतं, या आठवणी हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितल्या.
मिलिंद कॉलेजच्या ग्राउंडवर रझाक मामूंनी त्यावेळी मेजर यांच्यासोबत मिळून, गोल्फ खेळण्यासाठी ग्राउंड झीरो लेव्हलिंगचं तंत्र वापरलं. म्हणजे मैदानावर वाहनांचं डेड ऑइल टाकलं जायचं आणि ग्राउंडला विशिष्ट प्रकारे स्लोप दिला जायचा. याद्वारे पावसाचं कितीही पाणी पडलं तरी काही वेळात ग्राउंडवरून ते वाहून जात आणि खेळाडूंना खेळायची मुभा मिळायची. अशा प्रकारे औरंगाबादमधलं प्रत्येक मैदान, परभणी, नांदेडमधली मैदानं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उभी राहिली. मुंबईतलं वानखेडे मैदानाच्या उभारणीतही मामूंचा सल्ला घेण्यात आला. तर तिकडचं काही तंत्रज्ञान त्यांनी इथंही आणलं.
मिलिंद कॉलेजचं ग्राउंड तयार झाल्यावर तेथे विविध स्पर्धा होऊ लागल्या. यात हॉकीच्याही अनेक स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये रझाक मामूंही एकदा मेजर ध्यानचंद यांच्याविरोधात खेळल्याच्या आठवणी, मराठवाड्यातले दिग्गज क्रीडाप्रेमी सांगतात.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे रझाक मामूंना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जीवनसाधना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसेच 1997 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी रझाक मामूंची खूप धडपड असायची. कोणत्याही मैदानावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते कधी छोटं चॉकलेटच द्यायचे तर कधी हॉकीची बॅट द्यायचे. अगदी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका हॉकी स्पर्धेत त्यांनी स्वतःच्या पेन्शनच्या पैशांतून खेळाडूंसाठी ट्रॉफी आणून दिली, अशी माहिती पंकज भारसाखळे यांनी दिली.
नागसेनवन परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या क्रीडांगण परिसरात डोक्यावर कॅप घातलेले,अंगात कुर्ता,पायात स्पोर्ट शूज व खांद्यावर असलेली बॅग या साध्या वेशात रझाक मामू दिसून येत. कुणी संवाद साधला तर खूप उत्साहाने आपल्या आठवणींचा पेटारा उलगडून दाखवत. अत्यंत ऊर्जा देणारे हसतमुख व उर्जादायी व्यक्तिमत्व असे त्यांचे व्यक्तीमत्व होते… नागसेनवनातील क्रीडा क्षेत्रातील योगदानाविषयी भरभरून बोलायचे. त्यांच्याकडे असलेले महाविद्यालयाचे दुर्मिळ छायाचित्रे, सुमेध वसतिगृहाचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र त्यांनी जपून ठेवले होते ते दाखवत असताना त्यांच्या डोळ्यात नागसेनवन व बाबसाहेबांविषयीचे प्रेम भरभरून दिसत होते, अशा भावना मिलिंद नागसेनवर स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशवनचे सचिन निकम यांनी व्यक्त केल्या.