वाल्मिकी कराडला अटक करा… धनंजय मुंडे राजीनामा द्या, बीडमध्ये ‘काळा आक्रोश’; गर्दीचा उच्चांक

| Updated on: Dec 28, 2024 | 2:13 PM

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोठा सर्वपक्षीय मोर्चा निघाला आहे. हजारो लोकांनी काळ्या फिती आणि झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वाल्मिकी कराडला अटक करण्याची आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विविध पक्षांचे नेते आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा माणुसकीची लढाई असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

वाल्मिकी कराडला अटक करा... धनंजय मुंडे राजीनामा द्या, बीडमध्ये काळा आक्रोश; गर्दीचा उच्चांक
Massive Beed Rally
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघालाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले लोक दिसत आहेत. या काळ्या आक्रोशात महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुण मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. या मोर्चातून एकच मागणी करण्यात येत आहे, ती म्हणजे वाल्मिकी कराडला अटक करा. धनंजय मुंडे राजीनामा द्या… प्रत्येक मोर्चेकऱ्यांच्या तोंडी ही एकच मागणी आहे. सर्वजण या हत्येच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.

आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, प्रकाश सोळंके, मनोज जरांगे, ज्योती मेटे, जितेंद्र आव्हाड आदी नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात हजारो महिला आणि पुरुष सामील झाले आहेत. या मूक मोर्चात सर्वच पक्षाचे लोक आले आहेत. प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे आहेत. प्रत्येकाच्या हातात फलक आहे. संतोष देशमुखला न्याय द्या, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक करा, असं या फलकवर लिहिलेलं होतं. तसेच वाल्मिकी कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी हे मोर्चेकरी करत आहेत.

माणुसकीची लढाई

या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं आहे. प्रत्येक नेता आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत आहेत. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे, वाल्मिकी कराड यांना अटक करा. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा मोर्चात सहभागी झाले आहेत. वाल्मिकी कराड हा नरभक्षक आहे. तो महाराष्ट्रातील रमन राघव आहे. या नराधमाला ठेचलं पाहिजे. माझा आंदोलकांना पाठिंबा आहे. कारण ही माणुसकीची लढाई आहे. ही कोण्या पक्षाची लढाई नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर मोठी लढाई लढू

यावेळी अॅड. चंद्रकांत नवले यांनीही आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक करा. नाही तर आम्ही पुढची अजून मोठी लढाई लढू, असा इशारा नवले यांनी दिला.