औरंगाबादः शहरातील बहुचर्चित अशा प्रस्तावित चिकलठाणा ते वाळूज अखंड पूलासोबतच या मार्गावर एक मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्याची योजना महापालिकेने आखली होती. त्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत प्रकल्प व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र औरंगाबादेत एक नाही तर दोन मेट्रो रेल्वे धावण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी आधी प्राथमिक आराखडा आणि नंतर डीपीआर तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी मंगळवारी दिली.
1- शेंद्रा ते वाळूज-पंढरपूर या मार्गावर मेट्रो प्रकल्पा साकारण्याची महापालिकेची पूर्वीची योजना होती. केंद्रीय मंत्र्यांच्या प्लॅनमध्येही या मार्गाचा समावेश आहे.
2- बिडकीन ते हर्सूल या मार्गावरही मेट्रो रेल्वेचा प्रकल्पाची योजना असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी शहरात घेतलेल्या बैठकीत, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार असून नंतर डीपीआर तयार केला जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले. रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी महापालिका आणि महामेट्रो कंपनी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकाहीदेखील या बैठकीला उपस्थित होते. औरंगाबाद शहरात डबल डेकर पूल बनवून मेट्रोचे काम करावे, यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व नागरि विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे दिल्लीत प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
या बैठकीला मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे अतिरिक्त आयुक्त अरुण शिंदे, शहर मुख्य अभियंता सखाराम पानझडे, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह मेट्रोचे अतिरिक्त कार्यकारी व्यवस्थापक विकास नागुलकर, महामेट्रोचे सरव्यवस्थापक साकेत केळकर उपस्थित होते.
इतर बातम्या-