औरंगाबाद: गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या परतीकडे आशा लावून बसलेल्या राज्यभरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. काल म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने (Mansoon Reutrns in Maharashtra) एक्झिट घेतली आहे. यंदा राज्यात निर्धारीत वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले होते. आता मात्र नैऋत्य मोसमी पावसाने अर्थात मान्सूनने चार दिवस जास्त मुक्काम ठोकत गुरुवारी राज्याचा निरोप घेतला.
केरळात यंदा दोन दिवस उशिराने म्हणजे तीन जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. तेथून वेगाने तो पाच जून रोजी महाराष्ट्रात पोहोचला. जून ते 30 सप्टेंबर या काळात यंदा राज्यात सरासरीपेक्षा 19 टक्के जास्त पाऊस झाला. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चार हवामान उपविभागांपैकी यंदा मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा 48 टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागानुसार, राज्यातून सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परततो. यंदा तो चार दिवस जास्त मुक्कामी राहिला.
विशेष म्हणजे यंदा मराठवाड्याने सरासरीच्या बाबतीत कोकणालाही मागे टाकले. राज्यात यंदा जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला. राज्यात चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. नंदुरबार, सांगली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
आयएमडीच्या अहवालानुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुढीलप्रमाणे पाऊस पडला.
यंदा राज्यातील पावसाचे वितरण असमान राहिले. जून-जुलैमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने दडी मारली. ऑगस्टमध्ये संपूर्ण राज्यात 15 दिवस मान्सूनने ब्रेक घेतला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने ब्रेक घेतला. नंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे अवर्षणप्रवण व पर्जन्यछायेत येणाऱ्या मराठवाड्यात यंदा जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात 603.1 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. पण या वर्षी 1094.9 मिमी पाऊस पडला. सरासरी प्रमाण 82% एवढे राहिले.
बीड जिल्ह्यात 566.1 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. मात्र यावर्षी 945.2 मिमी पाऊस झाला. 67% सरासरी पाऊस पडला.
परभणी जिल्ह्यात 761.3 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. मात्र यावर्षी तो 1252.6 मिमी झाला. सरासरी 65% एवढा जास्त पाऊस पडला.
औरंगाबाद जिल्ह्यात 581.8 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा 947.7 मिमी पावसाची बरसात झाली. औरंगाबादेत पावसाचे सरासरी प्रमाण 63% जास्त पाऊस पडला.
मुंबई उपनगरात 2205.8 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा तो 3163.5 मिमी पडला. म्हणजेच सरासरी 43% पाऊस पडला.
इतर बातम्या-
‘फळ तोडणी’ ऐवजी ‘बाग तोडण्याची’च शेतकऱ्यावर नामुष्की, लाखोंचे नुकसान
Latur | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मागणीसाठी भाजपचे 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन