गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 31 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेाट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे महायुतीत येण्याबाबतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अयोध्या दौरा आणि टोलनाक्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट असतानाही महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना युतीत येण्याबाबतची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यात आता शिंदे गटाच्या एका खासदारनेही भर घातली आहे. या खासदाराने तर राज ठाकरे युतीत आले तर त्यांचं स्वागतच करू असं म्हणत राज यांच्यासाठी रेडकार्पेट अंथरले आहे.
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे एक मोठे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे वक्तृत्व चांगले आहे. त्यांचे संघटनही चांगले आहे. ते जर सोबत येत असतील तर आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांच्या स्वागताला उत्सुक आहोत. पण निर्णय राज ठाकरे काय घ्यायचा तो घेतील, असं मोठं विधान खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीच्या नेत्यांनी अचानक राज ठाकरे यांना महायुतीत येण्याची ऑफर देणारी विधाने सुरू केली आहेत. त्यामुळे पडद्यामागे काही ठरलंय का? अशी चर्चाही होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून लोकसभेच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी करतील. जागा वाटपात कोणताही वाद होणार नाही. किंवा कोणाचीही नाराजी होणार नाही. नरेंद्र मोदी याना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणार हेच आमचं सर्वांचं ध्येय आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून वरिष्ठ नेते मतदारसंघाची वाटणी करतील, असं जाधव म्हणाले.
मागच्यावेळी आम्ही जेवढ्या जागा लढल्या त्या सर्व लढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्याकडेच पक्ष आणि चिन्हही आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जागांसाठी आग्रही राहू. मागच्यावेळी आम्ही 22 जागा लढल्या होत्या. असं असलं तरी त्यात कमी जास्त होऊ शकतं. कारण तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे जागा वाटप करताना काही गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी 49 जागा महाराष्ट्रात मागायला पाहिजेत होत्या.त्यांनी 23 का मागितल्या हा प्रश्न आहे. पण त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी 48 पैकी 49 जागा मागायला पाहिजेत हव्या होत्या, असा टोला त्यांनी लगावला. तसेच येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणे, लोकांच्या हिताचे विकासात्मक कामे करणे, हाच पुढील वर्षाचा संकल्प राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.