औरंगाबाद: शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination) देण्यासाठी महापालिकेने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. आता शहरात खासगी रुग्णालयांपाठोपाठ आता हायकोर्ट व शहरातील चार मॉलमध्येही मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास बुधवारपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras Mandlecha) यांनी दिली. सध्या पालिकेच्या 39 आरोग्य केंद्रांत लसीकरण केले जात आहे. तसेच मिशन कवच कुंडलअंतर्गत 22 खासगी रुग्णालयांतही मोफत लसीकरणाची सोय केली आहे. औरंगाबादमधील हायकोर्ट, प्रोझोन मॉल, डीमार्ट मॉल हडको कॉर्नर व शहानूरमियाँ दर्गा, बेस्ट प्राइस विटखेडा, न्यू इंग्लिश स्कूल अय्यप्पा मंदिर बीड बायपास या ठिकाणी बुधवापासून लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. शहरात कोविशील्ड लसीकरणासाठी 65 केंद्रे तर कोव्हॅक्सिनच्या लसीकरणासाठी तीन केंद्रे आहेत.
सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोविशील्डचे 57 हजार तर कोव्हॅक्सिनचे 21 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लसीची कमतरता नाही. 18 वर्षांवरील तरुण-तरुणींनी तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोरोना मृत्यूवर मात केली. सुदैवाने गेल्या 24 तासात जिल्ह्यातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात 8 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील अवघ्या 3 आणि ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घसरण सुरुच असून, सध्या 120 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 48 हजार 994 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजवर 3 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील 6 आणि ग्रामीण भागातील 16, अशा 22 रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरु असताना जालना जिल्ह्यातील मंठा येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालये बुधवारपासून सुरु झाली आहेत. 13 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाआधारे 16 ऑक्टोबरला विद्यापीठाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा आहे. उर्वरित विद्यार्थी ऑनलाइन क्लासेस करतील. वर्ग मात्र 50टक्के क्षमतेनेच भरणार आहे.
इतर बातम्या-
PHOTO: ईद-ए-मिलाद निमित्त सजले औरंगाबाद, ऐतिहासिक दरवाजे, रस्ते, चौकांत विद्युत रंगांची उधळण