औरंगाबादः भालगाव निपाणी येथील शेतकरी बबन धुराजी शिंदे (65) हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दोन दिवसांपूर्वी ते रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले, मात्र संध्याकाळपर्यंत घरीच आले नव्हते. कुटुंबियांनी खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर पोलिसांत ते बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांनी या शेतकऱ्याचा मृतदेह परिसरातील मोकळ्या जागेत अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. मृतदेहाचा चेहरा आणि डोके दगडाने ठेचून त्यांचा खून (Murder in Aurangabad) करण्यात आला होता. तसेच निर्मनुष्य भाग असल्याने कुत्र्यांनीही या मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसून आले.
भालगाव येथील शेतकरी बबन धुराजी शिंदे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. ते मित्र किंवा नातेवाईकांच्या घरीही गेले नव्हते. अखेर बुधवारी 4 वाजता बीड बायपास रोडवरील सहारा सिटीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोकळ्या जागेत एका पुरुषाचा मृतदेह असल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. शिंदे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह तेथे आढळला. आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली.
उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आणि कुटुंबाने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृतदेह घाटीत रवाना करण्यात आला. शिंदे यांचा चेहरा, डोके, ठेचलेले दगड बाजूलाच आढळून आले. तसेच त्यांचे घड्याळ, मोबाइल जवळच होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचे कोणासोबतही वाद नव्हते. त्यांची दोन्ही मुले विवाहित असून ते पत्नीसह गावात राहत होते. मोठा मुलगा सुदाम याच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-