Nanded | बोगस दस्तावेज नोंदणी प्रकरणी महिनाभरानंतर पोलीस सक्रीय, नांदेडमध्ये 83 जणांवर गुन्हे

| Updated on: Apr 15, 2022 | 12:07 PM

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या काळात दस्तावेज नोंदणी झालेली 659 प्रकरणे संशयास्पद होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्याकडे या प्रकरणांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Nanded | बोगस दस्तावेज नोंदणी प्रकरणी महिनाभरानंतर पोलीस सक्रीय, नांदेडमध्ये 83 जणांवर गुन्हे
नांदेडमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्तावेज करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : पुण्यापाठोपाठ नांदेडमध्ये बनावट कागदपत्रांच्या (Bogus Documents) आधारे रजिस्ट्री (Registries) करण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यानी (Nanded Collector) या प्रकरणी दखल घेतल्याने आता 83 भूखंड माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एन ए , ले आउट, गुंठेवारीची बनावट कागदपत्रे वापरत भूखंडाची विक्री झालीय. विशेष म्हणजे स्वतः दुय्यम निबंधकांनी फिर्याद देऊन देखील हे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. राजकीय दबाव आणि भूखंड माफियांच्या आर्थिक दडपणाची देखील चर्चा रंगली होती. त्यात स्वतः नांदेडच्या जिल्हाधकाऱ्यांनी दखल घेत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता नांदेडच्या शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात 83 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता या दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर बडे भूखंड माफिया अडचणीत येणार आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या काळात दस्तावेज नोंदणी झालेली 659 प्रकरणे संशयास्पद होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्याकडे या प्रकरणांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सदर प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाली होती. या समितीने 186 प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले. त्यानंतर फेरचौकशी करण्यात आली. त्यात 105 प्रकरणांत बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला होता. तर 81 प्रकरणांत संबंधित दुय्यम निबंधकांनी विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल आल्यानंतरही संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नव्हते.

बुधवारी रात्री 83 जणांवर गुन्हे

बनावट दस्तावेज प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर बुधवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तसेच वझीराबाद पोलीस ठाण्यात मिळून अशा एकूण 80 जणांवर बोगस कागदपत्रांचा वापर करून दस्तवेज नोंदणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात सहाय्यक दुय्यम निबंधक मालती सुस्ते, राजेश मोकाटे यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. आता यात आणखी कुणाचे हात आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. यात अनेक प्लॉट/फ्लॅट निर्मिती करणाऱ्या बिल्डरांचा सहभाग आहे. पोलिसांनी सद्यस्थितीत 84 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता यात कुणाकुणाला अटक होते ते पाहण उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण या प्रकरणात सगळ्याच राजकीय पक्षांच्या समर्थकांचा देखील सहभाग आहे. त्यामुळे राजाश्रय असणाऱ्या या ठकसेनावर कठोर कारवाई होते की फक्त कागद काळे केले जातात हे पहावे लागणार आहे.

इतर बातम्या-

Sunil Mendhe | नाना पटोलेंचे कार्यकर्ते धान घोटाळ्यात सहभागी? भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा गौप्यस्फोट, सीबीआय चौकशी होणार

Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?