जालना | 22 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या आरक्षणासाठीच्या डेडलाईनला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाने राज्यातील गावागावात बॅनर्स, पोस्टर्स लावून मंत्री, खासदार आणि आमदारांना गावबंदी केली आहे. चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. नेते येताच त्यांना गावातून हुसकावून लावलं जात आहे. लग्न सोहळे आणि अंत्ययात्रेतही या नेत्यांना सहभागी होऊ दिलं जात नाहीये. आरक्षण देत नाही तोपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही, असं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, नाशिक, सोलापूर, सातारा, हिंगोली, नगर, धाराशीव आणि जळगावसह राज्यातील 515 गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात तर गावकरी अधिकच आक्रमक झाले आहेत. साताऱ्यातील वडुथ गावात नेत्यांना येण्यास मज्जाव केला जात आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, असा मजकूर लिहिलेले बॅनर्स साताऱ्यातील वडुथ गावात झळकले आहेत. विशेष म्हणजे नेत्यांवर बहिष्कार टाकणारं आणि त्यांना गावात प्रवेश न देणारं वडुथ हे सातारा जिल्ह्यातील पहिलंच गाव आहे.
या पुढील काळात नेत्यांनी आमच्या गावात प्रवेश करु नये आणि केला तर स्वत:ची मानमर्यादा राखून गावात प्रवेश करावा, असा इशाराच या बॅनर्सवरून देण्यात आला आहे. तसेच यापुढील काळात सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं सकल मराठा समाजाने जाहीर केलं आहे. आम्ही सर्व जरांगे पाटील यांच्याच सोबत असून जरांगे पाटील सांगतील तोच आदेश आम्ही मानू, अशा भावना सकल मराठा समाजातून व्यक्त होताना दिसत आहे.
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नगरमध्येही चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष… अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेश बंदी करण्यात आल्याचंही या बॅनर्सवर म्हटलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 12 गावांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गाव बंदी केली आहे. धाराशिव तालुका कावळेवाडी, तडवळा, गोपाळवाडी, येडशी, मेडसिंगा, उपळा, आरणी, रुई, खेड, कळंब तालुक्यातील मोहा, खामसवाडी आणि वाशी तालुक्यातील विजोरा येथे पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 85 ते 90 गावांमध्ये पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास सक्त मनाईचे बॅनर लागलेले आहेत. गावाच्या वेशीवर, चावडीवर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून आरक्षण आणून द्यायचं आहे का? असा सवाल राज्य सरकारला ग्रामस्थांनी केला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांनी ग्रामपंचायतीत ठराव करून निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलं आहे.
मराठा समाजाने केलेल्या गावबंदीमुळे राजकीय पक्षांचे ग्रामीण भागातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राजकीय पुढाऱ्यांना दौऱ्यावर निघताना गावबंदी आहे का? ही माहिती घेऊनच बाहेर पडावे लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कंजारा येथे ठाकरे गटाच्या एका नेत्याला गावकऱ्यांनी हुसकावून लावले आहे, तर हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक उमेदवाराच्या ग्रामीण भागातील प्रचारासाठी फिरणाऱ्या गाड्या बंद केल्या करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार आणि खासदारांना गावात प्रवेश बंदी करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत. मुक्ताईनगरच्या सारोळा गावात सखल मराठा समाजाने निषेध फलक लावले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार राजकीय नेत्यांना गावात प्रवेश देण्यात येणार नाही, अशा आशयाचं फलक लावून निषेध करण्यात आला आहे.