औरंगाबादः राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. त्यानंतर ते औरंगाबादमधील पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचं प्रकरण सुरु केलंय. केंद्रानं मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
आज मनसेच्या मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काय रणनिती आखली गेली, याविषयी पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, स्ट्रॅटजी वगैरे आत्ताच सांगत नाही. तुम्हाला सांगण्याएवढं अद्याप काही ठरलेलं नाही. जेव्हा ठरेल तेव्हा सांगितलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या-