औरंगाबादः इंग्लंडहून औरंगाबादेत येणाऱ्या कुटुंबातील एक तरुणी मुंबईत ओमिक्रॉनग्रस्त (Omicron) असल्याचे आढळून आले. सदर मुलीला मुंबईतच उपचार सुरु असून तिच्या कुटुंबातील आई, वडील आणि बहीण असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र तपासणीअंती मुलीचे 50 वर्षीय वडील कोरोनाबाधित (Corona Positive) असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची बाधा झालेली आहे काय, याचे निदान करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब पाठवण्यात आले.
औरंगाबादमधील एका नागरिकाला मुंबईत गेल्यावर ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. त्यानंतर मूळ औरंगाबादचे असलेल्या एका कुटुंबातील तरुणीला इंग्लंडहून येताना मुंबईत तपासणी केली असता ओमिक्रॉन झाल्याचे आढळून आले. 14 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर हे कुटुंब उतरले होते. तेथे त्यांनी औरंगाबादचा पत्ता दिला. तपासणीअंती तरुणी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले तर इतर तिघे निगेटिव्ह आले. बाधित मुलीचे वडील सात दिवस मुंबईतच क्वारंटाइन झाले तर आई आणि बहीण औरंगाबादेत येऊन एका हॉटेलमध्ये थांबले. बाधित युवतीचा आणि तिच्या कुटुंबियांचा औरंगाबादेतील कुणाशीही संपर्क आलेला नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन मनापाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, तरुणीचे वडील सात दिवसांचा क्वारंटाइन पिरिएड संपवून औरंगाबादेत आले. तेव्हा मात्र त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचे स्वॅबचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या वडिलांना महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच निगेटिव्ह आलेल्या आई आणि बहिणीलाही मेल्ट्रॉनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्या मुलीच्या वडिलांचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष आहे. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या कुटुंबांने कुणाशीही भेट घेणे टाळले, ही बाब दिलासादायक म्हणता येईल.
इतर बातम्या-