Omicron: औरंगाबादकरांनो बेफिकिरी सोडा! मराठवाड्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लस घ्या, नाही तर 500 दंड भरा!

| Updated on: Dec 14, 2021 | 9:29 AM

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात दुबईहून आलेल्या एका रुग्णाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मनाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली या आठही जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे.

Omicron: औरंगाबादकरांनो बेफिकिरी सोडा! मराठवाड्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लस घ्या, नाही तर 500 दंड भरा!
Omicron
Follow us on

औरंगाबादः जगावर घोंगावणारं संकट म्हणजे ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा शिरकाव आता मराठवाड्यातही झालाय. लातूरमध्ये एका दुबईतून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. त्यानंतर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील यंत्रणा अलर्ट (Alert) झाली आहे. लसीकरणाचे (Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात तर महिनाभरापासून कठोर नियमांची सक्ती केली जात आहे. आता औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. पात्र व्यक्तींना लस घेतली नसेल तर 15 डिसेंबरपासून नागरिकांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे, असे आदेश मनपा प्रशासकांनीही दिले आहेत.

टास्क फोर्सच्या बैठकीत कोणते निर्णय?

ओमिक्रॉनसाठी खबरदारी आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबादेत काल टास्क फोर्सची बैठक झाली. यात 15 डिसेंबरपर्यंत लस न घेणाऱ्यांवर कडक कारवाई आदेश देण्यात आले. तसेच मंगल कार्यालयात समारंभाच्या वेळी नागरिकांचे लसीकरण करावे, दुकानमालक , कामगारांचे दोन्ही डोस पूर्ण करून तसा फलक दुकानाबाहेर लावावा. जे दुकानदार लसीकरण करणार नाहीत, त्यांची दुकाने सील करावीत. तसेच लसीकरणाच्या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

लातूरमध्ये पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण

लातूर जिल्ह्यातील औसा शहरात एका 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मराठवाड्यातील हा पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये खबरदारीचे उपाय वाढवण्यात आले आहेत. दुबईहून 3 डिसेंबर रोजी लातूरमधील औशात आलेल्या प्रवाशाला संशयित रुग्ण म्हणून कॉरंटाइन करण्यात आले होते. त्याच्या घशातील द्रव्य नमूने पुण्याला पाठवण्यात आले होते. तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर आता त्याला औसा रोडवरील पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारण होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारपासून महापालिकेचे पथक शहरात

औरंगाबादमध्ये लसीकरणाच्या सक्तीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. उद्यापासून जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, अशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रशासकीय यंत्रणेच्या पथकांनी यासाठी तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी विनामास्क, रस्त्यांवर थुंकणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना मनपाचे नागरी मित्र पथक दंड आकारते. आता लस न घेणाऱ्यांचाही या पथकामार्फत शोध घेतला जाईल.

इतर बातम्या-

आज मोदी गुरुजींसमोर भाजप मुख्यमंत्र्यांची परिक्षा, दुपारी अनुयायांना संबोधित करणार, संपूर्ण दिनक्रम एका क्लिकवर

हॉर्न वाजवलात, गाडी चालवताना मोबाईलवर बोललात, हेल्मेट नाही घातलात तर सावधान, आजपासून खिसा रिकामा होणार, नियम लागू