औरंगाबादः शहरात दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन (Handloom Expo) भरले आहे. दिवाळी फराळापासून, विविध प्रकारची पीठे, सजावटीचे साहित्य, विविध ठिकाणची ओळख असलेले पारंपरिक कपडे हे सर्व एकाच छताखाली मिळणाऱ्या या प्रदर्शनाची (Diwali exhibition ) ओढ ग्राहकांना नेहमीच असते. कोरोना काळामुळे मागील दोन वर्षात औरंगाबादच्या ग्राहकांना अशा प्रदर्शनातील खरेदीला मुकावे लागले होते. या वर्षी मात्र शहरात भरलेल्या विविध प्रदर्शनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कलाग्राम येथे महानगरपालिकेच्या वतीने 23 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान तीन दिवसीय महिला बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शन व विक्री ळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात एकूण 106 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खाद्यपदार्थांची रेलचेल होती. दिवाळीसाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यापासून ते खाद्यपदार्थापर्यंत विविध घरगुती उत्पादित वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. तर या प्रदर्शनाला नंतर केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील आदी नेत्यांनी भेट दिली व बटत गटाच्या महिलांना प्रोत्साहन दिले.
शहरातील तापडिया कासलीवाल मैदान येथे दीपावलीनिमित्त हँडलूम एक्सपो प्रदर्शन सुरु झाले आहे. या प्रदर्शनात दीडशेहून अधिक सिल्क आणि कॉटनच्या विविध वस्त्रांची उपलब्धता आहे. प्रदर्शनात विविध राज्यांतून नामांकित कुशल कलाकारांचाही सहभाग आहे. येथील विणकरांकडून 20 टक्के सवलतही देण्यात येत आहे. 14 ऑक्टोबर रोजी सुरु झालेले हे प्रदर्शन 13 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहिल.
या प्रदर्शनातील प्युअल सिल्क, कॉटन हँडलूम, राजस्थान जयपुरी कॉटन बेडशीट, कोटा साडी, टॉप, उत्तर प्रदेश खादी सिल्क, बनारसी रेशीम, जमदाणी लखनौ चिकन वर्क, आंध्र प्रदेश- गडवाल साडी, धर्मावरम, व्यंकटगिरी, मध्यप्रदेश- चंदेरी आदी विविध राज्यांतील खास कपड्यांची व्हरायटी येथे पहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी निघालेल्या महिला वर्गासाठी हे प्रदर्शन नेहमीच एक पर्वणी ठरते.
उस्मानपुरा येथील गोपाल कल्चरल हॉल येथे दीपावलीच्या निमित्ताने विविध व्हरायटीचे खादी शर्ट, कॉटन कुर्ती सेल सुरु झाला आहे. हा खादी आणि कॉटन सेल मर्यादित कालावधीसाठी आहे. प्रदर्शनात खादीचे हाफ शर्ट 200 रुपयांपासून तर खादी कुर्तीज 250 रुपयांपासून खरेदी करता येत आहेत.
इतर बातम्या-