पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?

| Updated on: Oct 12, 2021 | 12:24 PM

येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने बीडच्या भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. (Pankaja Munde will address at Dasara Melava in beed)

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?
pankaja munde
Follow us on

बीड: येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने बीडच्या भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? पंकजा मुंडे भगवान गडावरून काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या मेळाव्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार का? याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

दोन वर्षानंतर पंकजा मुंडे बरसणार

दसरा मेळाव्यात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकार पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, या मुद्दयावरून त्या सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांकडेही त्या सरकारचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यानंतर पंकजा यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यामुळे पंकजा मुंडे त्यावर काय भाष्य करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उत्स्फूर्त बोलेन

दसरा मेळावा आमची परंपरा आहे. यावर्षी मंदिर खुली झाली आहेत. यावर्षी दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळावा हा कार्यक्रम राजकीय नाही. अनेक जण सहभागी होतात. अनेक लोक सहभागी होतात. नेता असो की कार्यकर्ता सर्व सहभागी होतात, असं सांगतानाच मी काय बोलेन ते दसरा मेळाव्यात नक्की ऐकायला या. लोकांच्या उत्साहासाठी हा मेळावा होतो, काय बोलायचं ते उत्स्फूर्त बोलेन, असं पंकजा यांनी सांगितलं. दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाईची घोषणा केली तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी उत्स्फूर्त भाषण करेन असं सांगून त्यांच्या भाषणाबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे.

भागवत कराड उपस्थित राहणार?

मोदी सरकारने केलेल्या नव्या विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती. त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे कराड या मेळाव्याला उपस्थित राहणार का? पंकजा मुंडे त्यांना निमंत्रण देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजांचं शक्तीप्रदर्शन?

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. सभा, मेळावे घेण्यास बंदी होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात दसऱ्या मेळाव्याचे जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. यंदा पहिल्यांदाच अटी आणि नियम घालून दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भगवान गडावरही पुन्हा त्याच जोशात दसरा मेळावा होणार आहे. या निमित्ताने तब्बल दोन वर्षानंतर पंकजा मुंडे शक्ती प्रदर्शन करून अनेकांना सूचक इशारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी बीडसह मुंबई-पुण्यातील पंकजा यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र अंधारात जाण्याची वेळ का आली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट

आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटक येण्यास सुरुवात

Maharashtra News LIVE Update | मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा जागीच मृत्यू, सोलापुरातील घटना

(Pankaja Munde will address at Dasara Melava in beed)