संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 25 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत. राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. पण या मुदतीत सरकारने काहीच न केल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीतच हे उपोषण होणार आहे. यावेळी राजकीय नेत्यांना गावबंदी असणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच आरक्षण देण्यात निरुत्साही आहे. त्यामुळेच आरक्षण दिलं जात नाही. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. हा विषय गंभीर आहे. मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे याची दखल घ्या. पूर्वी वाटायचे मोदींना गोरगरीबाच्या प्रश्नांची जाण आहे. पण ते खरोखरच गरीबांची दखल घेतात का याची थोडीशी शंका आहे, असं सांगतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना बैठक घ्यायची गरज नाही. त्यांचा एक फोन या तिघांना येऊ द्या. आरक्षण जाहीर झाल्याचा कागद 4 वाजेपर्यंत नाही आला तर बघा. दणादणा पळत येतील. आरक्षण दिल्याची ब्रेकिंग बातमी होईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणाबाबत सरकार निरुत्साही दिसतंय असं म्हणावं लागेल. गिरीश महाजन तर 15 दिवसात आरक्षण देतो म्हणाले होते. आता मुंबईत चला, आरक्षण मिळवून तुम्हाला दोन तासात परत आणून सोडतो असं महाजन म्हणाले होते. मी म्हटलं मी येत नाही. मी इथेच बरा आहे. ते 15 दिवसात आरक्षण देणार होते, आज 41 वा दिवस आहे. अजूनही आरक्षण नाही. याचा अर्थ काय? आम्ही शांततेच आंदोलन करणार आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. आपल्या जातीवर अन्याय होऊ नये म्हणून मी उपोषणाला बसत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मला कुणाचाही फोन आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांचा फोन आला होता. फोन उचलला होता. पण माझा मोबाईल मित्राकडे होता. लोकांना भेटण्याच्या नादात त्यांना परत फोन करायचं राहून गेलं. त्यांचाही फोन आला नाही. काल ही लोकांमध्ये होतो. त्यामुळे फोन करता आला नाही. त्यात का असणार आहे? नुसतं बोलणार होते. आरक्षणाचा जीआर काढला हे महाजन सांगणार होते का? कायदा पारित झाला असं थोडीच सांगणार होते. तसं असेल तर लगेच फोन लावतो, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही आक्रमक झालेलो नाही. आम्ही आक्रमक कुठे होत आहोत? हे आमचं घर आहे. येऊ नका आमच्या दारात. आम्ही तुमच्या दारात येणार नाही. तुम्ही आमच्या दारात येऊ नका. तुम्ही आला तर आक्रमक होणारच ना? असा सवाल त्यांनी केला.
छत्रपती संभाजी राजे हे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती संभाजी आणि उदयनराजे भोसले हे आमचे राजे आहेत. आम्ही त्यांचं स्वागतच करू. दोन्ही राजांचा आशीर्वाद घेऊ, असं त्यांनी सांगितलं.