औरंगाबादः दिवाळीच्या सुट्यांमध्ये (Diwali holidays ) अनेकजण बाहेरगावी जाण्याची योजना आखतात. अशा वेळी आपण गावी गेल्यावर आपल्या घराची राखण करणारा खरा पहारेकरी हा आपला शेजारीच असतो. याच तत्त्वानुसार औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) यंदाच्या दिवाळीनिमित्त ‘माझा शेजारी, खरा पहारेदार’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्ष नागरिक, सुरक्षित परिसर यावर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यालयातील पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.
दिवाळीनिमित्त शहरातील अनेक लोक बाहेरगावी जातात, काहीजण नातेवाईकांकडे जाऊन सण साजरा करतात. त्याचा फायदा घेत चोरटे दिवसा बंद घरांची रेकी करतात आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या करु शकतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट, बंगले, रो हाऊस या ठिकाणी जाऊन तेथील रहिवाशांसोबत बैठकीचे आयोजन पोलिसांनी करावे, अशा सूचना संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
– दिवाळीसाठी बाहेर किंवा गावी जाणार असाल तर त्याची माहिती शेजाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्यात द्या. अशा भागात पोलीस गस्त वाढवतील.
– बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या बंद घरातील मौल्यवान ऐवज रोकड, दागिने, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.
– सोसायट्या, बंगले, रोहाऊस अशा ठिकाणी नाइट वॉचमन, सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,
– सीसीटीव्ही बंद असल्यास दुरूस्त करून घेण्याबाबत सूचना संबंधितांना द्याव्यात.
– पोलिसांनी सोसायट्या, संवेदनशील ठिकाण, फार्महाऊस येथे भेट पुस्तिका लावावी.
– रात्री गल्तीवर असलेल्या अंमलदार, मार्शल यांनी भेट देऊन नोंद करावी.
– सुरक्षा रक्षकांना संपर्क क्रमांक द्यावे.
– गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग वाढवावी.
– बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची जाण्याची-परतण्याची नोंद करून त्या ठिकाणी गस्त वाढवावी.
– रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सतत चौकशी करा, प्रतिबंधात्मक कारवाई करा.
– संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग करून मोकळ्या मैदानात, आडबाजूला अंमलदार झोपलेले आढळणार नाही, याची दक्षता घ्या.
– उपलब्ध मनुष्यबळापैकी अधिक मनुष्यबळाचा वापर करून अचानकपणे कुठेही नाकेबंदी करावी. नाकाबंदीदरम्यान संशयित वाहने व व्यक्तींची तपासावे, नाकेबंदी प्रभावीपणे राबवावी.
इतर बातम्या-