औरंगाबादः देशातील सर्वाधिक निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नंबर पटकावल्यानंतर औरंगाबाद आता आणखी प्रगती करण्याच्या मार्गावर आहे. उद्योगनगरी औरंगाबादेतून ऑटोमोबाइल, फार्मा आदी क्षेत्रातील सुटे भाग आणि मालाची निर्यात तर होतेच. पण आता औरंगाबादच्या विमानतळावरून कृषी उत्पादनांचीही देश-विदेशापर्यंत वाहतूक करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी उडाण योजनेत चिकलठाणा विमानतळाचा समावेश करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली होती. या मागणीला नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Sindhiya) यांनी सकारात्कक प्रतिसाद दिला आहे. या योजनेत चिकलठाणा विमानतळाचा समावेश झाल्यास, संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक प्रगतीची वाट ठरेल, त्यांच्या शेतमालाला यामुळे चांगला भाव मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने निर्यातीबाबत नुकतेच एक सर्वेक्षण केले. यात निर्यातक्षम जिल्ह्यांत औरंगाबादचा 27 वा क्रमांक लागला. येथून ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वाधिक निर्यात होते, असे दिसून आले. विशेष म्हणजे सात उत्पादनांची निर्यात क्षमता असलेला औरंगाबाद हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असल्याचेही यातून सिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील मका, साखर, कांदा, मोसंबी अशा विविध कृषी उत्पादनांची निर्यात क्षमता केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली. तसेच चिकलठाणा विमानतळाचा कृषी उडाण योजनेत समावेश केल्यास येथील निर्यात आणखी वाढू शकेल, असे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्र पाठवून याबाबत हिरवा कंदिल दाखवला आहे.
कृषी उडाण योजना 2.0 ही डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत मालवाहू उत्पादनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणारी योजना आहे. सर्व कृषी उत्पादनांना सवलतीच्या दरा, विना अडथळा आणि नाशवंत होण्याच्या आत योग्य ठिकाणी पोहोचवणे, हा या योजनेमागील हेतू आहे. या योजनेत औरंगाबादचा समावेश करण्याची व्यवहार्यता आता केंद्र सरकारतर्फे पडताळून पाहिली जाईल. शेतकी मालाचे उत्पादन दुप्पट व्हावे, या करिता कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एवढेच नाही तर आता योग्य वेळेच बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून ही कृषी उडान योजना सुरु करण्यात आली आहे. नाशवंत अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आठ मार्ग देखील सुरू केले जातील. जसे की अमृतसर-दुबई हे बेबी कॉर्नची वाहतूक करण्यासाठी तर लिचीची वाहतुकीसाठी दरभंगा आणि सिक्कीम उर्वरित भारतातून सेंद्रिय उत्पादनाची वाहतूक केली जाणार असल्याचेही सिंधिया यांनी सांगितले आहे.
कृषी उडाण योजनेत विमानतळाचा सहभाग झाला तर विशेष कार्गो विमानाने येथील शेतकऱ्यांना थेट देश-विजेशात कृषीमाल पाठवता येईल. परदेशात माल पाठवण्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना रस्ते किंवा रेल्वेमार्गाचा पर्याय होता. मुंबईतून दुबई, चीन, युरोपात माल पाठवण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. आता शेतकऱ्यांना हवाई वाहतुकीने माल पाठवण्याची सोय अंगवळणी पडेपर्यंत कार्गोद्वारे माल मुंबईत पाठवला जाईल आणि तेथून परकीय बाजारपेठेत पोहोचवता येईल, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.
इतर बातम्या-