औरंगाबादः खुलताबाद पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाकर शिंदे यांची उपसभापतीपदी एकमताने निवड झाली. पंचायत समितीत भाजपचे पाच सदस्य निवडून आले आहेत. गेल्या पावणेपाच वर्षात आमदार प्रशांत बंब यांनी पाच पैकी चार सदस्यांना काही काळ सभापती आणि उपसभापती पदाचे पद दिले. उर्वरीत सदस्य प्रभाकर शिंदे यांना या पदाची संधी देणे बाकी होते. काल त्यांनी या पदासाठी निवड करण्यात आली.
साधारण महिनाभरापूर्वी उपसभापती युवराज ठेंगडे यांना आमदार प्रशांत बंब यांनी उपसभापती पदाचा राजीनामा देण्याचे सूचवले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पंचायत समिती सभागृहात या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र वाटप केले. यात प्रभाकर शिंदे यांचे एकच नामनिर्देशन पत्र आले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडली. दुपारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.
प्रभाकर शिंदे यांची उपसभापती पदावर निवड होताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून आनंद साजरा केला. नवनिर्वाचित उपसभापती प्रभाकर शिंदे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
इतर बातम्या-