जालनाः कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर रद्द झालेल्या रेल्वे गाड्या पुन्हा पुर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे. याच धर्तीवर जालना संघर्ष समितीने काही बंद पडलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. समितीच्या मागणीची दखल घेत, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यातील काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शुक्रवारपासून नांदेड ते मनमाड डेमू रेल्वे नियमित धावणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे. काल शुक्रवारी ही रेल्वे सुरु झाली. विशेष म्हणजे सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे ही रेल्वे चाकरमान्यांसाठी अधिक दिलासादायक ठरणार आहे.
सध्या एसटीचा संप सुरु असल्यामुळे नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब समितीने औरंगाबाद येथील राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच हुजूर साहिब नांदेड ते मनमाड ही डेमू रेल्वे सुरु करण्याची मागणी केली. या मागणीनुसार दानवे यांनी रेल्वे सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हुजूर साहिब नांदेड-मनमाड (0777) ही डेमू रेल्वे नांदेड येथून शुक्रवारी सायंकाळी 7.25 वाजता निघणार आहे. जालना रेल्वे स्थानकात रात्री 11.45 वाजता ही रेल्वे येईल. मनमाडला पहाटे 5.45 वाजता पोहोचेल. या मार्गावरील सर्व स्थानकांवर ही रेल्वे थांबेल. परतीच्या प्रवासात मनमाड-नांदेड ही डेमू रेल्वे सकाळी 6.10 वाजता निघणार असून जालन्यात ती 10.08 वाजता येईल. सध्या एसटीचा संप सुरु असल्याने या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
इतर बातम्या-