औरंगाबाद: हवामान विभागानं (Meterological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पावसानं जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी वातावरण काहीसं मोकळं असतं. सूर्यदर्शन झालं नाही तरी सकाळच्या वेळात पावसाना उघडीप घेतलेली असते. दुपारी चार वाजेनंतर मात्र औरंगाबादच्या ग्रामीण भागासह पाऊस चांगलाच जोर पकडत आहे. तेच सत्र आजही दिसून आलं.
औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला. मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीसह उस्मानाभाग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत वाढ झाली. मराठवाड्यातील बहुतांश धरणं भरत आली असली तरीही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्या काळात मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील तब्बल 145 मंडळात अतिवृष्टी झाली होती. काही दिवसांपूर्वी याच मंडळातील पिके ही पाण्याशिवाय गेली होती तर हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीचा फटका सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील 44, जालन्यातील 15, बीडमधील 22, लातुर 7, उस्मानाबाद 1, नांदेड 31 तर परभणी जिल्ह्यातील 26 मंडाळात अतिवृष्टी झाली होती. आता या पुढील पावसाने शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.
इतर बातम्या-
मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी