मुंबई : राज्यात सध्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादेतल्या सभेची जोरदार चर्चा आहे. या सभेसाठी डझनभर मनसे नेते आजच औरंगाबादेत दाखल झाले आहेत. तर राज ठाकरेही उद्या औरंगाबादला रवाना होणार आहेत. मात्र या सभेचा वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाही. आधी या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला. पोलिसांनी या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी या सभेला परवानगी दिली. त्यासाठी काही अटीशर्थीही ठेवण्यात आल्या. मात्र तरीही काही संघटनांनी अजूनही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशाराही एका संघटनेने दिला आहे. तर शिवसेना (Shivsena) नेत्यांनीही या सभेवरून राज ठाकरेंवर टीकेची झोड उडवली आहे. अशातच आता वचिंत बहुजन आघाडीही (Vanchit Bahujan Aghadi) राज ठाकरेंच्या सभेविरोधात आक्रमक झाली आहे.
राज ठाकरेंच्या सभेदिवशीच औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीचा शांती मार्च काढणार असल्याची माहिती समोर आल्याने आता पुन्हा नवं ट्विस्ट आलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे शांती मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच शहरातील क्रांती चौक ते पैठण गेट, महात्मा फुले पुतळा, औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत शांती मार्चसाठी त्यांनी परवानगी मागिलती असल्याचेही कळते आहे. शहरात शांतता आणि सद्भावना तसेच धार्मिक सौहार्द रहावे यासाठी शांती मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हातात मेणबत्ती घेत दोन दोन लोकांच्या गटाने रांग करुन घोषणाबाजी न करता शांती मार्च काढणार आहेत. तसेच पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली नाही तरी शांती मार्च काढणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष संदिप शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे.
आता आधीच एवढा विरोध त्यात वंचितचा मोर्चा त्यामुळे मनसेला घाम फुटणार का? तसेच पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मनसेच्या सभेला एवढा विरोध होत असताना पोलिसांनी परवानगी दिल्याने सभेवेळी शहरात शांतता राखण्याचे मोठे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे. तर दुसरीकडे उद्या सकाळी 8 वाजता राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार आहेत. औरंगाबादच्या सभेपूर्वी या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशिर्वाद देणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. त्यासाठी 5 डीसीपी 7 एसीपी आणि शेकडो पीआय, पीएसआयचा बंदोबस्त असणार आहे. तसेच प्रत्यक्ष मैदानावर 300 पोलिसांचा वेढा असणार आहे. तर मैदानाबाहेर आणि संपूर्ण शहरात 1700 पोलिसांचा कडा बंदोबस्त असणार आहे. या सभेसाटी मैदानावर 15 एचडी CCTV कॅमेरे लावण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या मागवण्याल्या आहेत. या सभेला 40 हजार लोक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.