औरंगाबाद : शनिवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray Speech) हिंदुत्वावरून बोलताना विरोधकांवर कडाडून टीका केली. तसेचत मशीदीवरील भोंग्यावरूनही कडकडतीत इशारा दिला. मशीदीवरील भोंगे (Mosque Loud Speaker) उतरलेच पाहिजेत, नाही काढले तर मशीदीसमोर स्पिकर लाऊन हनुमान चालीसेचे पठन करा असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला. मात्र त्यानंतर यावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. शिवसेना आणि मनसेत आता धार्मिक विषयांवरून फेसबूक वॉर सुरू झालं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve Facebook Post) यांनी थेट राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो फेसबूकवर पोस्ट केला आहे. तसेच त्यासोबत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यातून त्यांनी राज ठाकरेंवर खरपूस टीका केली आहे. लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्मावर बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
अंबादास यांनी फेसबूकवर पोस्ट करत लिहिले आहे की, कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्यानुसार कृती करेल तो खरा लोकनेता….आज जात,धर्म,प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही.लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे. व्यावसाय बुडाले आहे, नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे.महागाई चा आगडोंब भडकला आहे. केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर ते बोलले. शिवतीर्थावर झालेल्या गुढी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्या ऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी….राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्या कडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही. आणि शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज सबंध महाराष्ट्राला होतेय. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
अंबादास दानवे यांच्या या पोस्टनंतर आता मनसे आणि शिवसेनेत फेसबुक वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दानवे यांना मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी शिवतिर्थावर राज ठाकरेंनी पहिलं टार्गेट हे मुख्यमंत्री आणि शिवसेना ठेवलं. तर त्यांचं दुसरं टार्गेट राष्ट्रवादी आणि अजित पवार होते. त्यानंतर त्यांनी मशीदीवरील भोंग्यावरून जोरदार हल्लाबोल चढवला.