औरंगाबादः औरंगाबादमधील (Aurangabad) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा घोषणेपासूनच चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत भोंग्यावरून फोडलेले राजकीय फटाके अजूनही राज्यात वाजतायत. राज ठाकरे यांनी भोंग्यासंबंधी दिलेली डेडलाइन संपण्यापूर्वीच 1 मे रोजी, महाराष्ट्रदिनी त्यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. या सभेसाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून, कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने 2 हजार पोलिस (Police) , 720 एसआरपीएफ तैनात करण्यात येणार आहे. सभेच्या ठिकाणी मैदानात 300 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय 5 डीसीपी, 7 एसीपी आणि शेकडो पीआय, पीएसआय तैनात राहणार आहेत. तसेच मैदानातील प्रवेशद्वारावर 10 ते 15 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. याशिवाय पोलीस मुख्यालयातून सीसीटीव्हीवरून राज यांच्या सभेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचा स्टेज उभारण्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. स्टेज बॅरिकेटिंग आणि आसन व्यवस्थेचे कामही जोरात सुरू आहेत. 80 मंजुरांच्या सहाय्याने रात्रंदिवस सभेचे काम सुरू आहे. फक्त स्टेज आणि साउंड सिस्टीमचे काम बाकी आहे.
मनसेने राज यांच्या सभेचं चांगलं वातावरण तयार केलं आहे. सायकलवरून गल्ल्यांतून प्रचार करण्यात येत आहेत. काही सायकल तर सभेच्या मैदानात दाखल झाल्या आहेत.
राज यांच्या सभेसाठी 20 हजार झेंडे, 20 हजार रुमाल तर तब्बल 1 लाख पत्रिका छापण्यात आल्या आहेत. 1 लाख पत्रिकांपैकी 50 हजार पत्रिका वाटून पूर्ण झाल्या आहेत. 20 हजार झेंड्यानी औरंगाबाद शहर भगवामय करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तर सभेसाठी एक लाख नागरिकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे.
मनसे शिष्टमंडळ आणि पोलिस प्रशासनाची आज बैठक झाली. या बैठकीत सभेच्या पार्किंगविषयी चर्चा झाली. औरंगाबादमधील शहरातील कर्णपुरा भागात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी जाण्यासाठी 300 ते 500 रिक्षा कार्यकर्त्यांना बाबा पेट्रोल पंपापासून सभास्थळी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली.
औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही घटनेचे येथे तात्काळ पडसाद उमटतात. भीमा-कोरेगाव प्रकरणाचे शहरात असेच पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबादमध्ये अनेक दंगली झाल्या आहेत. शिवाय राज ठाकरे या सभेत वादग्रस्त बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही त्यांनी भोंग्याबद्दल अल्टीमेटम दिलाच आहे. हे सारे पाहता त्यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दिवशी शहरभर पोलीस तैनात राहणार आहेत. अनेकांनी राज यांच्या सभेला विरोधही केला आहे. त्यामुळे ऐनवेळी परिस्थिती चिघळायला नको, याची दक्षता आतापासूनच घेण्यात येत आहे.
राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्याचे समजते. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.