औरंगाबाद: राज्यसभेवर जायचं असेल तर हातात शिवबंधन बांधा, अशी ऑफर शिवसेनेकडून (shivsena) स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना देण्यात आली आहे. त्याला संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी नकार दिला आहे. त्यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. शिवसेनेला शिवबंधन बांधलेला माणूस लागतो. शिवबंधन बांधायचं आणि अडकवून टाकायचं हे त्यामागचं सूत्रं आहे. मग काय करायचं तो निर्णय करायचा. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. सर्व पक्षांचा पाठिंबा असावा असं संभाजी राजेंना वाटतं. पण शिवसेनेचं म्हणणं की शिवबंधन बांधा. एकदा शिवबंधन बांधलं की अडकून टाकायचं. मग राजे निवडून येवो की न येवो. राजेंना शिवबंधन बांधायचं तर जी राऊतांची सेफ जागा आहे. ती त्यांना द्या. सहाव्या जागेवर राऊतांना पाठवा. संभाजी राजेंना अडकवायचं नसेल तर हे कराच. त्यांना राज्यसभेवर सन्मानपूर्वक त्यांना पाठवायचं असेल तर त्यांना फर्स्ट जागा द्या. तरच त्यांचा सन्मान होईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भाजपने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय होईल. संभाजीराजे आणि शिवसेनेची काय चर्चा झाली माहीत नाही. शिवबंधन बांधावं, मगच सपोर्ट करू असं पेपरमधून वाचलं. ते संभाजीराजे आहेत. त्यांना उमेदवारी देताना भाजपच्या काळातही हाच विचार होता. पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निरोप आला होता. ते राजे आहेत. त्यांना सन्मानाने पद दिलं पाहिजे. त्यांना कोणत्याही निवडणुकीत उतरवायचे नाही, असं मोदींना आम्हाला सांगितलं. त्यामुळे त्यांना आम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले होते. आता भाजपच्या तीन जागा खाली होतात. त्यापैकी दोन जागा निवडून येतात. संभाजीराजेंची जागा खाली झाली ती महाराष्ट्राच्या कोट्यातील नाही, ती राष्ट्रपती नियुक्त जागा आहे, असं दानवे यांनी सांगितलं.
भाजपने आज जल आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचं सरकार होतं तेव्हा औरंगाबादकरांच्या पाणी योजनेसाठी 1680 कोटी रुपये दिले. पण ही योजना नव्या सरकारने रद्द केली. नव्याने योजना आणली. आम्ही वाट पाहिली दोन वर्ष. नवीन सरकार आलं काही चांगलं करेल वाटलं. पण त्यांनी केलं नाही. म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. हा काही स्टटं नाही, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेला बदनाम करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, आम्ही बदनाम करण्यासाठी मोर्चा काढतो की शहरातील लोकांना पाणी देण्यासाठी मोर्चा काढतो. हे शिवसेना ठरवू शकत नाही, ना भाजप, ना दोन्ही काँग्रेस. हे लोकच ठरवतील. हा निर्णय लोकांना करायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
जे भोकरदनला पाणी देऊ शकले नाही. ते औरंगाबादेत मोर्चा काढत आहेत, अशी टीका शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यावरही दानवे यांनी पलटवार केला. अब्दुल सत्तार आमचे मित्रं आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. भोकरदनवासियांना 24 तास पाणी मिळतंय. ते भोकरदनला आले तर त्यांना पाणी पाजू. काही चिंता नका करू. भोकरदनला पाणी टंचाई नाहीये, असा दावा त्यांनी केला.