औरंगाबादः हिवाळा लागताच असंख्य युरोपियन पक्षी भारतासारख्या उष्णकटिबंदीय प्रदेशाकडे स्थलांतर करु लागतात. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात असंख्य विदेशी पाहुणे औरंगाबाद परिसरातही पहायला मिळतात. जायकवाडी जलाशयावर तर अशा पक्षांचे थवेच्या थवे दिसतात. त्यामुळे हा काळ पक्षीप्रेमींसाठी पक्षी न्याहाळण्याकरिता जणू पर्वणीच असतो. औरंगाबादमधील पक्षीप्रेमींना नुकताच एक पक्षी पहिल्यांदाच शहरात आढळून आला. नागालँड सरकारने खास संरक्षण दिलेल्या या पक्ष्याचे भारतीय नाव आमूर ससाणा असे आहे.
पक्ष्यांचे गाढे अभ्यासक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक तसेच डॉ. विक्रांत पाटणकर यांना औरंगाबादेत वेरूळ परिसरात हा पक्षी दिसून आला. कबुतराच्या आखाराचा हा पक्षी 25 ते 32 सेंटीमीटर लांब आहे. शहरात दिसला त्यावेळी हा देखणा पक्षी तारेवर बसून शेत पिकातील किडे खाण्यात मग्न होता. प्रथमदर्शनी हा पक्षी युरशियन हॉबी असावा असे डॉक्टर पाठक यांना वाटले आणि त्याचे अनेक छायाचित्रे टिपली. नंतर ही छायाचित्रे तज्ञांना पाठवून त्यांच्याकडून हा पक्षी अमूर फाल्कन आहे असे निश्चित केले. हा पक्षी प्रथमच आपल्या भागात दिसला आहे. हा पक्षी स्थलांतरित असून मंगोलिया चीन सायबेरिया येथून प्रवास सुरू करून भारता मार्गे आफ्रिकेला हिवाळा घालवण्यासाठी जातो.
भारतामध्ये नागालँडमध्ये या पक्षाचा दोन ते तीन आठवडे मुक्काम असतो. नागालँडपर्यंत जाताना हा पक्षी महाराष्ट्रात पुणे, मुंबई व काही भागात थोडे दिवस पंथस्थ म्हणून दिसून येतो. 22,000 किलोमीटरचा विक्रमी प्रवास हा पक्षी मंगोलिया ते आफ्रिका आणि पुन्हा वापस असा करत असतो. हा ससाणा मंगोलिया चीन आणि रशिया या अमर नदीच्या भागांमध्ये वीण घालत असतो. नागालँड परिसरात मुक्कामाला असताना या पक्षाची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे. परंतु वनविभाग पक्षीमित्र निसर्ग संस्था यांच्या प्रयत्नाने स्थानिकांचे प्रबोधन करून आता या पक्षांच्या हत्या थांबवल्या आहेत. नागालँड सरकारने या पक्षाला संरक्षण दिले आहे.
हा देखणा पक्षी कबूतराएवढा असून त्याचा रंग राखाडी करडा असतो. शेपटी व मांडी तांबूस रंगाची असते.डोळ्या भोवतीची कडा,डोक्याचा मागचा भाग व पाय नारंगी तांबूस रंगाचे असतात.मादीच्या पोटावर छातीवर का रंगाचे ठिपके असतात. नाकतोडे टोळ व कीटक हे या पक्ष्याचे अन्न आहे.
इतर बातम्या-