औरंगाबादः शहरातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पैठण गेट (Paithan Gate Aurangabad) परिसरात असंख्य लहान-मोठी दुकाने थाटलेली आहेत. मात्र पैठण गेटभोवतीच (Aurangabad market) अनेक हातगाड्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
गुरुवारी पैठण गेट सभोवतालचे हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. याप्रकरणी पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी महानगरपालिका व वाहतूक पोलिस प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आली.
दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथक आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, रंगार गल्ली, शहागंज, सराफा व सिटी चौक या सर्व भागात रस्त्यावर थांबून हात गाड्यावर साहित्य विक्री करणे, वाहतूकीला अडथळा करणे अशा अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पैठण गेट परिसरातून एकूण पंधरा ते सतरा हातगाड्या, रंगार गल्ली येथून एक पाणीपुरीची गाडी, एक साधी गाडी जप्त करण्यात आली. शहागंज परिसरातून रस्त्यावर प्लास्टिकचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते ते निष्कासित करण्यात आले.
गुलमंडी रस्त्यावरही हातगाड्यांची असंख्य दुकाने थाटलेली असतात. यामुळे बाजारपेठातील रस्ता अत्यंत अरुंद होतो. ग्राहकांना येथून वाहने चालवणे अन् पायी चालणेही कठीण जाते. त्यामुळे कालच्या कारवाईत गुलमंडी भागातून पूर्ण रस्त्यावर लावण्यात आलेले टेबल जप्त करण्यात आले. सराफा येथील दोन व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध दुकानासमोर लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते ते काढण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरातील पूर्णपणे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कोमे, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी कारवाईत सहभाग घेतला.
इतर बातम्या-
सिडको वाळूज महानगराचे औरंगाबाद महापालिका हस्तांतरण कामाला वेग, सुविधांचे होणार संयुक्त सर्वेक्षण