औरंगाबाद: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यावर तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अतिवृष्टीने कहरच केला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 27 सप्टेंबरपासून राजस्थानमधून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाचा जोर कायम आहे. महाराष्ट्रातील काही भागात 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कमी होत जाईल, अशी चिन्ह आहेत. मात्र येत्या काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आणखी एका चक्रिवादळाचा तडाखा बसणार असल्याची माहिती, प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
दरम्यान मराठवाड्यातील बहुतांश भागांना अजूनही परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागाला परतीचा पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. विशेषतः वीजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने ग्रामीण भागात मोठं नुकसान होत आहे. शुक्रवारी सोयगावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. तर कन्नड तालुक्यातील जेहुर ठाकरवाडी इथे वीज पडून अकरा जनावरांचा मृत्यू झाला.
प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची दिशा पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात झाले की याचे ‘जवाद’ असे नामकरण होईल. साधारण चौदा पंधरा तारखेला हे ‘जवाद’ चक्रीवादळ निर्माण होणार आहे . व पुढे 16 ऑक्टोबर ला जवाद हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी या चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, महाराष्टारील विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकण व दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित महाराष्ट्रात येत्या दोन तीन दिवसात परतीचा पाऊस पूर्ण माघार घेईल असे दिसत आहे. उत्तरेकडे थंडीची चाहूल लागली आहे. मात्र जवाद चक्रिवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडिचे आगमन उशीराने होईल, अशी शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरावर परतीचा पावसाचे जोरदार सायंकाळच्या वेळी आगमन होत असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.
०7 ऑक्टोबर 2021 रोजी औरंगाबाद शहरावर सायंकाळी 5. 24 वाजता पावसाला सुरूवात झाली व 5. 26 ते पुढील बारा मिनीटे म्हणजे 5.38 या झालेल्या मुसळधार पावसाने रुप धारण केले. या बारा मिनीटांदरम्यान 25 मिली मीटर पावसाची नोंद झाली यावेळी पावसाचा सरासरी वेग 116.2 मीमी प्रती तास नोंदला गेला. याची एमजीएम जेएनईसी वेधशाळेत नोंद घेण्यात आली.
इतर बातम्या-