लातूरः औरंगाबादमध्ये नागपूरच्या धर्तीवर 20 किलोमीटर लांबीचा तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. भारतातील रस्ते व पूल बांधणीत अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असून कमी खर्चात, कमी वेळेत दर्जेदार काम केले जाईल, अशी ग्वाहीदेखील नितीन गडकरी यांनी लातूरमध्ये बोलताना दिली. लातूर जिल्ह्यातील 19 महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरी यांच्या घोषणेनुसार, औरंगाबाद ते वाळूज हा उड्डाणपूल झाल्यास पुणे, नगरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे. आपल्या भाषणातही त्यांनी या पुलाचे महत्त्व स्पष्ट केले. नव्या प्रकल्पामुळे औरंगाबादच्या चौकातून थेट वाळूजपर्यंत वाहनधारकांना जाणे सोयीचे होईल. परिणामी पुण्याला जाणे अधिक सोपे होईल.
लातूर जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. यावेळी नियोजित तीन मजली उड्डाणपुलाविषयी बोलताना बनसोडे म्हणाले, या प्रकल्पात पहिल्या मजल्यावर आठ पदरी लेन असेल तर दुसऱ्या मजल्यावर आमखी एक पूल असेल. तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो, इलेक्ट्रिकवर चालणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यरत करण्याची योजना आहे. मराठवाड्याला 20 हजार कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. रस्ते हे केवळ गावे जोडत नाहीत तर माणसांची मनेही जोडतात, असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.
इतर बातम्या-