बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात रासपचे नेते महादेव जानकर यांनीही तडाखेबंद भाषण केलं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना जात नव्हती. मुंडे नसते तर महादेव जानकर मेंढरं राखायला गेला असता, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.
महादेव जानकर यांनी दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करून सर्वांना पंकजा मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचं आवाहन केलं. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचा नव्हता. ब्राह्मणांचाही नव्हता आणि मुस्लिमांचाही नव्हता. भगवानबाबा सर्वांचेच होते. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस, पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे, असं जानकर म्हणाले.
काल ओबीसींची एमपीएससी आणि यूपीएसीची लिस्ट जाहीर झाली. त्यातील भगवान बाबांच्या जातीची 272 पैकी 36 पोरं यूपीएससी, एमपीएससी उत्तीर्ण झाली. ही सर्व गोपीनाथ मुंडे यांची देण आहे. एखादा मंत्री आणि आमदार होईल. मंत्रीपदाच्या मांडवा खालून मीही गेलो आहे. काय पॉवर आणि काय असतं आम्हाला माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजाताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार, खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव? पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? असा सवाल करतानाच सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.
हा महादेव जानकर मेला तरी चालेल. पण ताई, महादेव जानकर तुला सोडणार नाही. 31 मेला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलंय, असं सांगतानाच नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागत. आरशासमोर भाषण केल्याने नेता होत नाही. नकली ते नकलीच असतं. नेता व्हायला अक्कल लागते, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंचा शायराना अंदाज, कोण रोखतंय ताईंना, पक्षातले की बाहेरचे?
दिल्ली, नवी मुंबई, नाशिक, पंकजा मुंडेंनी कार्यक्रमच जाहीर केला, गावागावात जाऊन संवाद साधणार
(RSP leader mahadev jankar address Dussehra rally at beed)